शिवाजीनगर, 11 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
राष्ट्रनिर्माणात शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन करताना पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पुणे मनपा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. ई-लर्निंग, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि कौशल्याधिष्ठित ज्ञान या क्षेत्रात शिक्षक सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या गुरुकुल पद्धतीतील शालेय अनुभवांची उजळणी करताना समाजात विद्यार्थ्यांना सक्षमपणे उभे करणे हेच शिक्षकांचे मुख्य ध्येय असल्याचे सांगितले.
मनपाच्या वतीने आयोजित ‘आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 2025’ या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांच्या हस्ते मनपाच्या प्राथमिक शाळांमधील 10 आणि खासगी शाळांमधील 5 आदर्श शिक्षकांना मानपत्र, सन्मानचिन्ह व टॅब देऊन गौरविण्यात आले. हा सोहळा मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. कार्यक्रमास आमदार बापूसाहेब पठारे, अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, उपप्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण यांच्यासह शहरातील शिक्षक, पुरस्कारप्राप्त शिक्षक, त्यांचे नातेवाईक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात नवल किशोर राम यांनी पुढील एका वर्षात 75 ‘मॉडेल शाळा’ उभारण्यात येतील, तसेच तीन वर्षांत सर्व शाळा मॉडेल करण्याचा संकल्प व्यक्त केला. शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी करण्याचे ओशास- नही त्यांनी दिले. विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी मनपाच्या वतीने ‘पुस्तक मेळावा’ आयोजित केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. मराठी संस्कृती आणि भाषा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावरही त्यांनी भर दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विभागाचे उपायुक्त विजय थोरात यांनी केले. मनपा सर्व शिक्षकांना आदर्श मानते, तसेच समाविष्ट गावांसह सर्व शाळांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखरे यांनी शिक्षक दिनानिमित्त गुरू-शिष्य परंपरेला बळकटी मिळते असे सांगितले आणि समाजाला प्रेरणा देणारे शिक्षकच खरे आदर्श असल्याचे मत व्यक्त केले.