पुणे-मुंबई महामार्गावर चार्जिंग सुविधा; एमएसआरडीसी सर्वेक्षण करणार

11 Sep 2025 16:19:42
 
 

charging 
राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन धाेरणानुसार पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर आठ ईव्ही चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) चार्जिंग स्थानक काेठे उभारायचे, याबाबत महामार्गावर सर्वेक्षण करणार आहे. त्यामुळे आता या द्रुतगती महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास सुकर हाेणार आहे.रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या ‘वाहन’ या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 5.58 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने नाेंदणीकृत आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून दैनंदिन सरासरी 1.4 लाख वाहने ये-जा करतात. वाहतूक काेंडी, अपघात या कारणांमुळे इलेक्ट्रिक वाहने रस्त्यात अडकून पडल्याने इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग क्षमता कमी हाेते.
 
अचानक वाहने रस्त्यात बंद पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण हाेत आहे. त्यामुळे एमएसआरडीसीने इलेक्ट्रिक वाहनांसाठी तातडीने चार्जिंग स्थानके आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर उच्च ऊर्जा चार्जिंगविषयक पायाभूत सुविधा सुरळीत कार्यान्वित करण्यासाठी आठ चार्जिंग स्थानके आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमएसआरडीसीने पावले उचलली आहेत. या महामार्गावर आठ स्थानकांची जागा निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जागा निश्चित करून निविदा प्रक्रियेद्वारे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0