पुणे, 9 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
मराठा समाजाने आंदोलनाद्वारे मुंबईकरांना वेठीस धरून असंविधानिक मागण्या मान्य करून घेतल्या. आंदोलनाच्या दबावाखाली सरकार आमच्या ताटातील घास हिसकावणार असेल, तर ओबीसी समाज हे कदापिही सहन करणार नाही. राज्यपातळीवर आंदोलन करून आम्ही आमच्या हक्कासाठी लढा देऊ असा इशारा समता परिषद, सकल ओबीसी समाज पुणे आणि पिंपरी चिंचवड यांनी आज महाघंटानाद आंदोलनाद्वारे दिला. ओबीसी संघटनांच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांना वाटा देऊ नये, या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देउन ही मागणी केली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मंजिरी धाडगे, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली पंढरीनाथ बनकर, दीपक जगताप, स्मिता लडकत, बाळासाहेब लडकत, गायत्री लडकत, सपना माळी, रवी लडकत, मंदार लडकत, वैष्णवी सातव, अविनाश चौरे, सागर दरोडे, मृणाल ढोले पाटील, वृषाली वाडकर, सारंग राऊत, रिमा लडकत, गिरीश झगडे, नाना कुदळे, विजय कोठावळे आणि गणेश वाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. ओबीसी समाजातील शेवटच्या पातळीपर्यंत आरक्षणाचे लाभ अजूनही पोहोचलेले नसताना आमच्या आरक्षणात भागीदारी नको, अशी स्पष्ट भूमिका या आंदोलनात घेण्यात आली.
मराठा समाजाचे सरसकट होणारे कुणबीकरण हा ओबीसी समाजावरील अन्याय असून सरकार त्या लोकांना खिडकीतून किंवा मागील दाराने प्रवेश देऊन ओबीसींवर अन्याय करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी काढलेला जीआर रद्द न केल्यास त्याविरोधात राज्यव्यापी करण्यात येईल. आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नसून त्यांनी आरक्षणासाठी वेगळी चूल मांडावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.