तैसा जन्मांतरीं बहुतीं। उपासितां श्रीलक्ष्मीपती। तूं दैवें आजि हातीं। जाहलासी जरी।। (3.25)

07 Aug 2025 23:11:16
 
 

saint 
श्रीकृष्ण अर्जुनास वारंवार समजावून सांगत आहेत, युद्धास प्रवृत्त करीत आहेत, तरी अर्जुन आपला हेका साेडत नाही. ताे परमेश्वरांना अनेक शंका विचारून त्यांनाच ज्ञान सांगत राहिला आहे. ह्याबद्दल श्रीकृष्णांना खरे म्हणजे राग यावयाचा, पण अर्जुनाच्या प्रेमाने तेही माेहित झाले असल्यामुळे अर्जुनाची समजूत काढणे एवढेच ते विविध प्रकारांनी करताना दिसतात. अशा या देवांना अर्जुन माेठ्या धिटाईने म्हणताे की, देवा, तुम्ही थापा मारून माझा प्रश्न टाळीत आहात किंवा काही गुप्त रीत सांगून तात्त्विक चर्चा करीत आहात.पण देवा, असे आडमार्गाचे बाेलणे पुरे करा. मला समजेल अशा प्राकृत म्हणजे साेप्या भाषेत इष्ट काय आहे ते सांगा. देवा, मी मूढमती आहे. माझ्या मंदबुद्धीला समजू शकेल असा निश्चित एक विचारतुम्ही मला सांगावा. राेग जाईल असे गाेड औषध तुम्ही मला द्यावे. देवा, तुझ्यासारखा गुरू व मार्गदर्शक प्राप्त झाल्यावर मी माझी इच्छा पूर्ण करून का घेऊ नये?
 
एथ भीड कवणाचि धरूं! तू माय आमुचिŸ।’ (21) देवा तू आमची आई आहेस. मग मी संकाेच कशासाठी करावा? माझे दैव असे की, माझ्याच अंगणात दुभती अशी कामधेनू आहे. माझ्या हाती चिंतामणी सापडला आहे.मग माझे मनाेरथ पूर्ण का हाेणार नाहीत? समुद्राच्या पाण्याने माझी तहान भागली नाही म्हणून तर मी अमृताच्या सागरावर आलाे. आणि देवा, हा सागर मला सहजासहजी प्राप्त झालेला नाही.मी मागील अनेक जन्मांत उपासना केल्यामुळे तुमच्यासारखा समर्थ गुरू सुदैवाने मला प्राप्त झाला आहे. मग माझी इच्छा मी का पूर्ण करू नये? अर्जुनाचे हे म्हणणे खरेच आहे. श्रीकृष्णांनी आपले बाेधरहस्य अर्जुनाच्याच पदरात टाकले आहे. (क्रमशः)
Powered By Sangraha 9.0