पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर (तवा) आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग फ्रेट काॅरिडाॅर या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने भरवीर (ता. चांदवड, जि. नाशिक) येथे जाेडण्यात येणार आहे. या 104.898 कि.मी.च्या या महामार्गास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला आहे. प्रकल्पासाठी हुडकाेकडून 1500 काेटींचे कर्ज उभारण्यात येणार आहे. या कर्जासह 2528 काेटी 90 लाखांच्या तरतुदीसही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.प्रकल्पाचे काम 3 वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.वाढवण ट्रान्सशीपमेंट हे बंदर वाढवण पाेर्ट प्राेजेक्ट लिमिटेडच्या माध्यमातून बांधले जात आहे. वाढवण बंदराच्या माध्यमातून जलमार्गे हाेणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक देशातील सर्व भागांपर्यंत वेगाने व किफायतशीर दरात पाेहाेचण्याच्या दृष्टीने हे बंदर समृद्धी महामार्गाला जाेडण्याचा प्रस्ताव आहे.
केंद्राच्या राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सागरमाला प्रकल्पांतर्गत सध्या वाढवण बंदर ते तवापर्यंत (रा. म. 48) 32. कि. मी.महामार्गाचे काम हाती घेतले आहे. समृद्धी महामार्गावरून वाढवण बंदराकडे जाण्यासाठी भरवीर-आमणे (समृद्धी महामार्ग) ते बडाेदा-मुंबई द्रुतगती मार्गावरून जावे लागते. त्यामुळे जवळजवळ 82 कि.मी.चा अनावश्यक प्रवास करावा लागताे. वाढवण बंदराच्या भविष्यातील माेठ्या प्रमाणावरील वाहतूक वर्दळीचा विचार करता विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील वाहतूक वर्दळीस उपयु्नत अशा महामार्गाची निर्मिती आवश्यक आहे. हा शीघ्रसंचार द्रूतगती महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार आणि माेखाडा या आणि नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांतून जाणार आहे. या महामार्गामुळे भरवीर हे बडाेदा-मुंबई एक्सप्रेस मार्गे अंतर समृद्धी महामार्ग 183.48 कि.मी. ऐवजी 104.898 कि.मी.हाेणार आहे. वाढवण बंदर ते भरवीर हा प्रवास 1 ते 1.5 तासांवर येणार असल्यामुळे वाहतुकीच्या वेळेत माेठी बचत हाेणार आहे.