मराठी वाचू या, बोलू या; वृत्तपत्र स्टॉलवर प्रेरणादायी छत्री

07 Aug 2025 13:59:36
 
 mar
मुंबई, 6 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
मराठी भाषेच्या जपणुकीसाठी आणि तरुणाई व विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने लोअर परळ येथील वृत्तपत्र स्टॉलवर ‌‘मराठी वाचू या, मराठी बोलू या, मराठी अभिजात जपू या‌’! अशा प्रेरणादायी घोषवाक्यांनी सजलेली भव्य छत्री उभारण्यात आली. बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ मंगळवारी सकाळी 11 वाजता समाजसेवक डॉ. नीलेश मानकर यांच्या हस्ते झाला.
 
यावेळी संघाचे कार्याध्यक्ष मधुसूदन सदडेकर, सरचिटणीस संजय चौकेकर, खजिनदार रवींद्र चिले, सल्लागार अजित सहस्त्रबुद्धे ठाणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे सरचिटणीस संतोष विचारे आणि उद्योजक रत्नाकर चंदन आदी मान्यवर अपस्थित होते. योवळी मान्यवरांनी उप्रकमाचे कौतुक केले. मराठी वर्तमानपत्राच्या वाचनामुळे तरुण आणि विद्यार्थ्यांचे विचार अधिक समृद्ध होती. त्यांच्यात मराठी भाषेबाबतचा अभिमान दृढ होईल.
 
मराठी त्यांनी वाचली, तरच भाषेची समृद्धी टिकेल, असे त्यांनी सांगितले. मुंबईतील प्रत्येक वृत्तपत्र स्टॉलवर हा उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. मराठी भाषेच्या प्रसारासाठी आणि वर्तमानपत्र वाचनाला चालना देण्यासाठी वृत्तपत्र विक्रेते हेच समाजातील खरे प्रचारक आणि भाषेचे शिलेदार ठरू शकतात, असा आशावादही व्यक्त करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0