ब्रूस ली हा हाॅलिवुडच्या सिनेमातला पहिला मार्शल आर्ट्सपटू. त्याचं अकाली निधन झाल्यामुळे त्याच्याभाेवती एक गूढतेचं वलय तयार झालं. त्याचा मुलगा ब्रँडन ली याचाही अपघाती मृत्यू झाला तरुण वयात, त्यामुळे तर हे वलय आणखी गडद झालं. पण, ब्रूस हयात असतानाच लिव्हिंग लेजंड बनला हाेता. त्याचा अफाट वेग, त्याच्या किकची, पंचेसची ताकद यांच्याबद्दल खूप बाेललं गेलं आहे. ब्रूस लीच्या सिनेमांमधली वेगवान अॅक्शन स्लाे माेशनमध्ये चित्रित करून दाखवावी लागते, कारण त्याशिवाय ती कळूच शकत नाही. हाॅलिवुडच्या आणि पाश्चिमात्य जगताच्या हिशाेबात शारीरिक उंची कमी, शरीर सडपातळ तरीही अतिप्रचंड ताकद आणि कमालीची चपळाई यांचं दर्शन घडवून ब्रूस ली एक आयकाॅन बनला. ताकदीचं प्रतीक असलेल्या ब्रूसमध्ये प्रत्यक्षात मात्र शारीरिक वैगुण्यं हाेती. त्याचा एक पाय दुसऱ्यापेक्षा तब्बल एका इंचाने लहान हाेता. तरीही ते कधी कुणाला समजलं नाही. त्याच्या डाेळ्यांचा नंबर उणे 10 हाेता.म्हणजे लेन्सेस लावल्याशिवाय त्याला समाेरचं काहीच दिसायचं नाही. तरीही ताे राेज 5000 पंचेसची प्रॅक्टिस करायचा. ताे म्हणायचा, ज्याला किकचे 10 हजार प्रकार माहिती आहेत, त्याची मला भीती वाटत नाही, ज्याने एकच किक 10 हजार वेळा घटवली आहे, त्याला मी घाबरताे.