पुणे, 5 ऑगस्ट (आ.प्र.) :
रस्ते आणि पदपथ दुरुस्तीची कामे तातडीने करून शहरात होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली. शिरोळे म्हणाले, ‘त्यांच्या मतदारसंघात औंध येथे नागरस रोडवर 30 जुलैला सायंकाळी ज्येष्ठ नागरिकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. नागरस रोडवरील राहुल रेस्टॉरंटसमोर रस्ता आणि साईड पट्टी यांची समान पातळी नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाची दुचाकी घसरली आणि ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी पाठीमागून आलेले येणारे चारचाकी वाहन त्यांच्या अंगावरून गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे. तेथील रस्ता दुरुस्ती तातडीने करण्यास सांगितले. त्याची कार्यवाही झाली.
मतदारसंघात, तसेच शहराच्या अनेक भागांत अशीच स्थिती आहे. त्यामुळे, रस्ते आणि पदपथ दुरुस्तीची कामे तातडीने करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. रस्त्यावरील खड्डे बुजवले जावेत, रस्ता आणि साइड पट्टी याच्यामधील पातळी व्यवस्थित असावी, रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने करावे, रस्ते आणि ड्रेनेजची झाकणे ही समान पातळीवर करावीत, पदपथावरील खड्डे बुजवावेत, पथपथांवरील अतिक्रमणे काढावीत, अशा सूचना शिरोळे यांनी निवेदनात केल्या आहेत.
औंध आणि परिसरासाठीही आमदार शिरोळे यांनी उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यात औंधमधील वाहतूक नियोजन करण्यासाठी पार्किंग व्यवस्था सुलभ कराव्यात. सिग्नल चालू करावेत. सिग्नलच्या आजूबाजूचे पार्किंग बंद करावे, विद्यापीठ चौक ते ब्रेमेन चौक राजभवन रस्ता हा अतिक्रमण मुक्त करावा, भाले चौक, मेडी पॉइंट चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कॉसमॉस बँक चौक, अशा गर्दीच्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस अथवा वॉर्डनची व्यवस्था करावी, अशी मागणी शिरोळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.