तलाव पर्यटनवृद्धीसाठी लघुपट मालिका करणार

06 Aug 2025 23:13:53
 
 

Lake 
तलावांचे शहर अशी ठाण्याची ओळख आहे. शहरातील विविध तलाव नागरिकांच्या विरंगुळ्याचे प्रमुख ठिकाण आहेत, तर याच तलावांचे आकर्षण लक्षात घेत शहरातील विविध नेत्यांकडून या तलावांच्या काठी विविध महाेत्सवांचे आयाेजन करण्यात येत असते.
या पार्श्वभूमीवर आत जिल्हा प्रशासनाकडून ठाण्यातील तलावांच्या पर्यटनवृद्धीसाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून शहरातील तलावांचे लघुपट जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहेत. या लघुपटांच्या माध्यमातून तलावांचा इतिहास आणि पर्यटनबाबत सविस्तर माहिती देऊन नागरिकांना तलाव पर्यटनासाठी आवाहन करण्यात येत आहे.
 
ठाणे शहरात ज्या पद्धतीने औद्याेगिकरणाचा इतिहास आहे, त्याच पद्धतीने या शहराला आणि जिल्ह्याला पर्यटनाचाही वारसा लाभला आहे.जिल्यातील विविध तालुक्यांतील धार्मिक स्थळे राज्य व देशपातळीवरील धार्मिक पर्यटनस्थळे म्हणून नावारूपाला येऊ लागली आहे. तसेच, जिल्ह्याला लाभलेली खाडी, खाडी किनारी येणारे विविध परदेशी पक्षी आजही अनेक पर्यटकांना आकर्षित करतात.
अंबरनाथ येथील सुमारे 900 वर्षांहून प्राचीन शिवमंदिराला भेट देण्यासाठी अनेक भाविक राज्यभरातून येत आहेत. याच पद्धतीने ठाणे शहरातील विविध भागांत असलेले माेठाले तलावही नागरिकांच्या पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरत आहेतठाणे शहरात उपवन, मासुंदा तलाव, रायलादेवी, कचराळी, मखमली यांसह विविध तलाव आहेत. यातील उपवन आणि मासुंदा तलाव हे शहरातील इतर तलावांच्या तुलनेत अधिक प्रसिद्ध आहेत.
 
या तलावांच्या परिसरात अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या, मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टे यांसह विविध सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या दाेन्ही तलावांच्या काठी सायंकाळी आणि सुट्टीच्या दिवशी माेठी गर्दी हाेते. याच पार्श्वभूमीवर या तलावांच्या पर्यटन वाढीसाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून सध्या शहरातील महत्त्वाच्या तलावांवर आधारित लघुपटांची मालिका तयार करण्यात आली आहे. हे लघुपट समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत असून, यात तलावांचा ऐतिहासिक संदर्भ, त्यांच्या जडणघडणीमागील माहिती, त्यांच्याशी निगडित लाेककथा आणि पर्यावरणीय महत्त्वाचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0