पर्यटन स्थळांच्या ठिकाणी ‘सुरक्षा दल’ हा पर्यटन विभागाकडून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे.मुंबईतील पर्यटनस्थळावर सुरक्षेच्या दृष्टीने गेट वे ऑफ इंडिया आणि गिरगाव चाैपाटी, नरिमन पाॅइंट येथे ‘पर्यटन सुरक्षा दल’ नेमण्याची कार्यवाही करा, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. देसाई यांच्या निवासस्थानी याबाबत बैठक झाली. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पयटन संचालक डाॅ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर जयस्वाल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित हाेते. सध्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘पर्यटन सुरक्षा दल’ हा उपक्रम सुरू आहे. टप्प्या-टप्प्याने या उपक्रमाची राज्यात व्याप्ती वाढवण्यात येत आहे. मुंबईत पर्यटक माेठ्या प्रमाणात येत असून, पर्यटकांना सुरक्षा दिल्यास सुरक्षित पर्यटन हाेऊन पर्यटन वाढीला चालना मिळेल.पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पाॅइंट येथे ‘पर्यटक सुरक्षा दल’ नेमावे, अशा सूचना देसाई यांनी दिल्या.