हार्ले डेव्हिडसन ही भारतातही अनेक माेटरसायकल शाैकिनांची ड्रीम बाइक असते. जेवढ्या रकमेत एक छाेटी कार येईल, तेवढे पैसे हार्लेवर खर्च हाेतात. ती इंधन कार्यक्षमही नाही. अतिशय बाेजड आहे. हत्ती पाळण्यासारखा प्रकार आहे. उपयाेग कमी, खर्च जास्त. तरीही लाेक हत्तीही पाळतात आणि हार्लेही घेतात. हे यश त्यांच्या मार्केटिंगचं आहे.1981 सालात ही कंपनी डबघाईला आली हाेती.हाेंडासारख्या जपानी कंपन्यांनी बाइकची व्याख्या बदलून टाकली, छाेट्या, कमी इंधनखर्च करणाऱ्या, काैटुंबिक वापराच्या, शांत, कमी आवाज करणाऱ्या बाइक्स त्यांनी काढल्या. या बाइक्स अफाट लाेकप्रिय झाल्या.
हार्ले डेव्हिडसनच्या बाेजड, कर्कश्श आणि वारंवार बंद पडणाऱ्या महागड्या बाइक्सचं मार्केट ओसरायला लागलं. त्यांच्या खपात 40 ट्न्नयांची घट झाली. कंपनी बंद पडण्याची वेळ आली. तेव्हा कंपनीच्या 13 कर्मचाऱ्यांनी मिळून आठ काेटी डाॅलर या किंमतीला ती विकत घेण्याचा प्रस्ताव दिला. तेव्हा त्यांच्याकडे इतके पैसेही नव्हते. या कर्मचाऱ्यांनी ग्राहक काय म्हणतात ते जाणून घेण्यासाठी त्यांचे हार्ले ओनर्स ग्रूप (हाॅग ग्रूप) तयार केले. त्यांच्या ग्रूप राइड्स आयाेजित केल्या.रस्त्यांवर हार्ले मालकांचा जथा दिसू लागला. सगळ्यात आश्चर्य म्हणजे एक्झाॅस्टचा कर्कश्श आवाज त्यांनी ट्रेडमार्क म्हणून नाेंदवला. तीच आपली ओळख बनवून टाकली.