मनपा निवडणुकीत प्रशासन व पोलिसांचा गैरवापर थांबवावा

06 Aug 2025 13:55:41
 
 m
पुणे/शिवाजीनगर, 5 ऑगस्ट
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून, प्रभागरचना व इतर प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. मात्र, या प्रक्रियेत सत्ताधारी भाजपचा हस्तक्षेप वाढत चालला आहे, जो अत्यंत चिंतेचा विषय आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या म्हणण्यानुसार, भाजप आपल्या राजकीय फायद्यासाठी प्रभागांची रचना मनमानी पद्धतीने करत आहे. तसेच, शहरात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रोत्साहन देत आहे. यामध्ये मनपा प्रशासन व पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांचे सत्ताधाऱ्यांना सहकार्य लाभत असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे.
 
 m 
 
या पार्श्वभूमीवर सोमवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. भाजपचा हस्तक्षेप जर असाच सुरू राहिला व मनपा प्रशासनाने वेळेवर सुधारणा न केल्यास, प्रभागरचनेला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशारा आघाडीच्या नेत्यांनी दिला. तसेच, शहरात हेतुपुरस्सर धार्मिक व जातीय तेढ निर्माण करून सत्ताधारी भाजप राजकीय पोळी भाजत असल्याची टीका नेत्यांनी केली.
 
पोलीस प्रशासनाने अशा प्रकारांवर कठोर भूमिका घेत, पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, अशी मागणीही करण्यात आली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे अरविंद शिंदे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, आमदार बापू पठारे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, कमल व्यवहारे, वसंत मोरे, रवींद्र माळवदकर, सुनील माने, किशोर कांबळे, सुजित यादव, आसिफ शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0