पुणे, 4 ऑगस्ट (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
संविधान का बदलावे? या पुस्तकाच्या प्रकाशनावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने गुरुवारी प्रशासनावर जोरदार टीका केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवत संबंधित प्रकाशनाला दिलेल्या परवानगीबाबत नाराजी व्यक्त केली. पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, भारताची राज्यघटना ही देशातील समस्त नागरिकांच्या इच्छा व आकांक्षांमधून निर्माण झाली आहे. ती प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संधी देते.
मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ही घटना मान्य नाही. ती बदलण्यासाठी ते गेल्या काही वर्षांपासून छुपे प्रयत्न करत आहेत. 2014 पासून केंद्रात आरएसएसप्रेरित सरकार सत्तेत आल्यानंतर हे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. संविधान का बदलावे? हे पुस्तक जाहीर कार्यक्रमात प्रकाशित केले जाते, यावरून घटनाबदल हा त्यांचा अजेंडा असल्याचे स्पष्ट होते. अशा प्रकारच्या प्रकाशनाला पोलिसांनी परवानगीच कशी दिली, हा मोठा प्रश्न आहे, असे जगताप यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात माजी आमदार जयदेव गायकवाड, रवींद्र माळवदकर, शेखर धावडे, नरेश पगडाल्लू, अनिता पवार, पायल चव्हाण, श्रद्धा जाधव, सुनील माने, फईम शेख, किशोर कांबळे, दिलशाद आत्तार, अजिंक्य पालकर, वसुधा निरभवने, रूपाली शेलार आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. या प्रसंगी राज्यघटनेच्या प्रतींचे नागरिकांना विनामूल्य वाटप करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्या प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.