पुणे, 3 ऑगस्ट (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
राज्य शासनाच्या आदेशानुसार येत्या आज महापालिकेकडून आगामी महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना राज्य शासनाला सादर केली जाणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष युती आणि आघाडी म्हणून एकत्र लढणार असल्याचे तूर्तास सांगत असले, तरी प्रभाग आपल्याच पद्धतीने व्हावेत, यासाठी महापालिकेत यापूर्वीचे सत्ताधारी असलेल्या भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी भाजपची नेतेमंडळी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेत असल्याच्या चर्चेने युतीतील अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे टेन्शन वाढले आहे.
मात्र, ही प्रारूप रचना राज्य शासनामार्फत निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याने वरिष्ठ स्तरावर त्यामध्ये अनुषंगिक दुरुस्त्या करण्यास वाव असल्याची मनाची समजूत घालत टेन्शनमधून रिलिफ मिळवत असल्याने उत्सुकता वाढली आहे. आरक्षणामुळे महापालिकेच्या निवडणुका तीन वर्षांहून अधिक काळ लांबल्या आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर येत्या काही महिन्यांत निवडणुका होणार असून, त्या दृष्टीने प्रशासकीय कामकाजही सुरू झाले आहे. तूर्तास प्रारूप प्रभाग रचना करण्याचे काम सुरू असून, वेळापत्रकानुसार हे प्रारूप 4 ऑगस्टला शासनाकडे सादर करायचे आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे महापालिकेत 165 सदस्य असतील. चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार 39 प्रभाग हे चारसदस्यीय; तर तीन प्रभाग हे तीनसदस्यीय असतील असा अंदाज आहे. दरम्यान, यापूर्वी 2017 मध्ये केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने महापालिका निवडणुकीत सर्वच स्तरावर वरचष्मा राखत दणदणीत यश मिळवत एकहाती सत्ता राखली. या निवडणुकीत एकट्या रिपाइं या मित्रपक्षाला बोटावर मोजण्या इतपत जागा देत; परंतु त्यांच्याही उमेदवारांना कमळ या चिन्हावर निवडणूक लढण्यास भाग पाडत हे यश मिळविले; परंतु मागील आठ वर्षांत बरीच उलथापालथ झाली.
राज्यात आणि केंद्रात अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती झाली आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर यासारख्या मोठ्या महापालिकांतील गरज लक्षात ठेवून भाजपला आगामी निवडणुकीत ऐनवेळी पुणे महापालिकेत 2017 मध्ये निवडून आलेल्या जागांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे; परंतु यानंतरही सत्तेत मोठा भाऊ आपणच असू, यासाठी अगदी प्रभाग रचनेपासून सर्व स्थिती अनुकूल करण्यासाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. प्रभाग रचना हा यातील अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याने भाजप नेत्यांनी सत्तेचा वापर करत अनुकूल प्रभाग रचना करण्यासाठी प्रशासनावर दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे.
भाजप नेत्यांच्या महापालिका आयुक्त आणि अन्य नेत्यांसोबतच्या भेटीगाठींमुळे युतीतील मित्रपक्षांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसंगी पूर्वीपेक्षा कमी जागा वाट्याला आल्या तरी स्ट्राइक रेट वाढविण्यासाठी ताकद असलेल्या ठिकाणी प्रभाग रचना अनुकूल करण्यासाठी भाजपकडून किमान पुण्यात तरी सर्व मार्गांचा वापर होऊ शकतो, असे युतीतील मित्रपक्षांचे नेते खासगीत उघडपणे बोलू लागले आहेत. त्याचवेळी प्रशासनाने तयार केलेला प्रारूप आराखडा राज्य शासनाकडे जाणार आहे. तेथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामार्फत आवश्यक त्या दुरुस्त्या करून घेण्याचा आशावादही व्यक्त केला जात आहे. या धूसफुशीची दखल घेत महाविकास आघाडीतील पक्ष प्रशासनाला इशारा देत आहेत. प्रभाग रचना तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, स्वत: महापालिका आयुक्त प्रभाग रचनेच्या कामात सहभागी झाले आहेत. त्यांनी महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात ठाण मांडल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.