बाजार समित्यांमधील गैरप्रकारांना आळा घाला

30 Aug 2025 14:32:22
 
 baj
पुणे, 29 ऑगस्ट
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
पुणे, मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या सहा बाजार समित्यांना लवकरच राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. याबाबतच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, अधिसूचना कोणत्याही क्षणी निघणार आहे. या धास्तीने बाजार समित्यांमध्ये संचालक मंडळाने आर्थिक लालसेपोटी मालमत्ता विक्री, मोठ्या रकमेच्या निविदा काढण्याच्या कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या सहा बाजार समित्यांमधील निविदा आणि मालमत्ता विक्रीवर बंधने आणण्याबरोबरच याच्या चौकशीची मागणी करणारे पत्र पणन संचालकांना दिले आहे.
 
राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली, नागपूर, नाशिक या बाजार समित्यांना लवकरच राष्ट्रीय दर्जा देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर संचालक मंडळाचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. या धास्तीने विविध बाजार समित्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार शिजत आहेत. यामधील मुंबई बाजार समितीमध्ये 150 कोटींचे सुमारे 200 गाळे आणि 40 कोटींच्या रस्ते काँक्रिटीकरण घोटाळा समोर आला. या घोटाळ्याला पणन संचालक विकास रसाळ यांनी रोखत चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
अशाच प्रकारे पुणे बाजार समितीमध्ये विविध निविदा प्रक्रिया काढण्याची लगीनघाई सुरू असल्याचे समजते आहे, तर काही विभागप्रमुखांना वसुलीचे टार्गेट दिले असल्याची चर्चा बाजार आवारात रंगली आहे, तर मुंबई बाजार समितीमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाच्या 40 कोटींच्या निविदेत तीन कोटी कमिशन काही संचालकांनी घेतले आहे. मात्र, आता या निविदेचीच चौकशी लागल्याने कंत्राटदार अडचणीत आला आहे. बाजार समितीमध्ये दिलेले पैसे वसूल करण्यासाठी कंत्राटदार हेलपाटे मारत आहेत, तर गाळे विक्रीमध्ये काही संचालकांनी सुमारे 13 कोटी रुपये गोळा केल्याची चर्चा बाजार आवारात आहे.
 
जहाज बुडता बुडता हाताला येईल तेवढे घेण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. ज्या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा दिला जाणार तेथील सर्व व्यवहार थांबवावेत. धोरणात्मक निर्णय घेण्यापासून संचालक मंडळाला रोखावे, असे विनंतीपत्र राज्याच्या पणन संचालकांना दिले आहे. पणनमंत्र्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून गैरप्रकाराला आळा घालावा.
- राजू शेट्टी, (अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)
Powered By Sangraha 9.0