‌‘दगडूशेठ‌’ गणपतीची उत्साहात प्राणप्रतिष्ठा

29 Aug 2025 13:59:30
 
 da
पुणे, 28 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... च्या जयघोषात फुलांनी सजवलेल्या रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या जय गणेश प्रांगणात साकारलेल्या प्रतिकृतीमध्ये ‌‘दगडूशेठ‌’चे गणपती बाप्पा विराजमान झाले. मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते संध्याकाळी झाले. या रोषणाईमुळे परिसर उजळून निघाला. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच अलोट गर्दी केली होती.
 
यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 133 व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. चतुर्थीला सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगणात केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरू श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधेीशर श्री श्री 1008 प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते ‌‘श्रीं‌’ची प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानंतर प्रांगणात विविध धार्मिक कार्यक्रम व याग पार पडले.
Powered By Sangraha 9.0