पुनर्रोपणातून वृक्षांना नवजीवन देण्याचा आरएमडी फाऊंडेशनचा उपक्रम

28 Aug 2025 14:29:59
 
 jan
पुणे, 26 ऑगस्ट (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
‘विकासकामे आवश्यकच आहेत. रस्ते, बांधकाम आणि इतर कामे देशभर होतच असतात. मात्र, त्यावेळी वृक्षतोड केली जाते. या प्रक्रियेत परिपक्व वृक्ष तोडले जाणे म्हणजे पर्यावरणाची मोठी हानी करण्यासारखे असते. हेच टाळण्याचा प्रयत्न आरएमडी फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. वृक्ष पुनर्रो पणामुळे या झाडांना दुसरे जीवन मिळू शकते. त्यासाठीच आरएमडी धारिवाल फाउंडेशनने वृक्ष पुनर्रोपण अभियान सुरू केले आहे,‌’ अशी माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन यांनी सोमवारी (26 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत दिली.
 
या वेळी फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष शोभाताई धारिवाल, उद्योजक पुनीत बालन उपस्थित होते. जान्हवी धारिवाल-बालन म्हणाल्या, ‌‘परिपक्व वृक्षांची सरसकट तोड करण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण केले पाहिजे. अशा वृक्षांना नवजीवन देणे हेच आमच्या अभियानाचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने राबवला जात आहे. एक परिपक्व झाड दररोज चार व्यक्तींसाठी पुरेसा ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू निर्माण करते. प्रत्येक झाड दरवर्षी 10 ते 40 किलो कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेते. या झाडाचे प्रत्यारोपण केल्यास सुमारे 80 टक्के झाडे व्यवस्थित जगतात आणि पर्यावरणाची हानी टळते.‌’ आत्तापर्यंत फाऊंडेशनच्या माध्यमातून रिंगरोड, मुंढवा, घोरपडी आणि बी. जी. शिर्के रोड परिसरात तब्बल 2,100हून अधिक परिपक्व झाडांचे पुनर्रोपण केल्याचे त्यांनी सांगितले. ‌‘
 
आपल्या सोसायटीत आपण वृक्षांचे पुनर्रोपण करू शकतो. बांधकाम व्यावसायिकांनी देखील विकासकामे करताना जी झाडे तोडायची आहेत ते आधी कळवल्यास त्याचेही यशस्वी पुनर्रोपण होऊ शकते. ही झाडे शेतजमिनी, लष्कराच्या जागेत किंवा वन विभागात हलवता येऊ शकतात. त्यासाठी निधीदेखील स्वीकारला जाईल. झाडाच्या वयानुसार आणि आकारानुसार एका झाडाला पुनर्रोपित करण्यासाठी पाच ते चाळीस हजार रुपये खर्च येतो. झाड दत्तक घेऊन या उपक्रमाला चालना देता येऊ शकते. बांधकाम व्यावसायिक संघटनांशीही आम्ही या विषयावर बोलणार आहोत,‌’ असेही जान्हवी धारिवाल म्हणाल्या.
 
सर्वांनी एकत्र येऊन चळवळ पुढे न्यावी
वृक्ष पुनर्रोपणाच्या कार्यात बरीच आव्हाने आहेत. सुमारे 172 किमी लांबीच्या पुणे रिंगरोड प्रकल्पामुळे हजारो झाडे तोडली जाण्याची शक्यता आहे. ही झाडे वाचविण्याचे कार्य कोणतीही एक व्यक्ती, एक संस्था यांच्या क्षमतेपेक्षा खूपच मोठे आहे. त्यामुळेच अनेक संस्था, कंपन्या आणि समाजाने एकत्र येऊन ही चळवळ पुढे न्यायला हवी.
-जान्हवी धारिवाल-बालन (अध्यक्षा, आरएमडी फाऊंडेशन)
 
आरएमडी धारिवाल फाऊंडेशनचे मुख्यालय पुणे येथे असून, गेली 40 वर्षे रसिकलाल एम. धारिवाल आणि श्रीमती शोभा आर. धारिवाल यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सातत्याने कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि आपत्ती निवारण अशा क्षेत्रांमध्ये 50हून अधिक संस्थांद्वारे फाऊंडेशनने असंख्य नागरिकांच्या जीवनावर कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव टाकला आहे. सध्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन हा वारसा पुढे नेत आहेत. वृक्ष पुनर्रोपण अभियानाची माहिती www.rmdfoundation.org.in/ tree-transplantation येथे मिळू शकेल.
 
jan 
Powered By Sangraha 9.0