ठाणे, 26 ऑगस्ट (आ.प्र.) :
आधार सहकारी पतपेढी मर्यादित ठाणे या पतसंस्थेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 24 ऑगस्ट रोजी नुरी हॉल, मखमली तलाव, चंदनवाडी, ठाणे येथे अनेक मान्यवर, प्रशासकीय अधिकारी व सभासदांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. प्रसंगी संस्थेची अद्ययावत स्थिती, पाच शाखांची 8483 सभासद संख्या, संस्थेचे खेळते भांडवल 122 कोटी, जुलैपर्यंत संमिश्र व्यवसाय 175 कोटी व निव्वळ नफा 1.22 कोटी झाला असून, संस्थेने ‘अ’ वर्ग राखला आहे. प्रसंगी इतिवृत मंजूर करणे, लेखापरीक्षण करणे, दिलेली व वसूल कर्जे, संस्थेचा नफा व तोटा तसेच यावेळी 12% लाभांश मंजूर करण्यात आला. आठ हजारांपेक्षा जास्त सभासद असलेल्या पतपेढीच्या सर्वसाधारण सभेस अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अनेक मान्यवरांचा अध्यक्ष भरतशेठ दांगट यांच्यासह इतर उपस्थित संचालकांकडून सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी ॲडिशनल कलेक्टर शिवाजीराव दावभट, विलास डुंबरे सेवानिवृत्त म्हाडा इंजीनिअर, तनुजा मस्करे (सदाकाळ) कक्ष अधिकारी वित्त विभाग मंत्रालय, किसनराव भोसले महानगर बँक, तानाजी पासलकर (शहर विकास अधिकारी), दादाभाऊ रेपाळे, ॲड. भाऊसाहेब शेळके, ॲड. विजय वाघमारे, शोभा वामन, समाजसेवक सुधीरजी मोहनलाल कोटक यांसह अनेक ठेवीदार व सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर सर्व सभासदांसाठी शनिवारी 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता शुभश्री हॉल, अहिनवेवाडी फाटा, कल्याण-नगर हायवे, ओतूर, जुन्नर (पुणे) येथे सभासद प्रशिक्षण कार्यक्रम व मेळावा आयोजित केल्याची माहिती अध्यक्षांनी दिली. तद्नंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व संस्थेतर्फे अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला.