श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यांतील प्रेमाचे व जिव्हाळ्याचे दर्शन घडविणारी ही आणखी एक ओवी आहे.आपल्या मनातील शंका विचारताना अर्जुन अत्यंत नम्रपणे श्रीकृष्णांना म्हणत आहे, की देवा, तू अत्यंत कृपाळू आहेस. आईप्रमाणे स्वाभाविक प्रेम तुझे माझ्यावर आहे. देवा, या संसार दु:खात पाेळलेल्या जीवांना तू सावलीप्रमाणे आहेस. श्रीकृष्णा, जे अनाथ असतील त्यांची तू आई आहेस आणि देवा, आम्ही तर तुझ्याच कृपेचे फळ आहाेत. एखाद्या पांगळ्या मुलाची चिंता आईसच वहावी लागते, अशी आमची काळजी देवा तूच करताेस. म्हणून देवा, या भूमिकेवर मी एक प्रश्न विचारीत आहे. माझ्या बाेलण्याचा राग मात्र येऊ देऊ नकाेस. हा कर्मयाेग तू पूर्वी ववस्वानाला सांगितला हाेतास. हे मात्र माझ्या मनास नीटसे पटत नाही. कारण हा विवस्वान कितीतरी वर्षांपूर्वी हाेऊन गेला आणि तू तर आत्ता आमच्यापुढे उभा आहेस.
मग ार पूर्वी हाेऊन गेलेल्या विवस्वानाला तू कसा उपदेश करणार? पण देवा, तुझी लीला अगाध आहे. आम्ही पामरांनी ती काय जाणावी? तुझे बाेलणे खाेटे तरी कसे मानावे? तरी देवा, तू विवस्वानाला कसा उपदेश केलास ते मला सांग. अर्जुनाच्या या शंकेचेस्पष्टीकरण श्रीकृष्णांनी केले ते महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, की मी तसा जन्मरहित असून लाेकांना जन्मल्यासारखा वाटताे.खरे पाहता जन्मणे व संपणे हे माझ्या ठिकाणी नाही.पण मायेमुळे जन्ममृत्यूंचा देखावा इतरांना दिसताे.आरशात वस्तूचे प्रतिबिंब दिसते पण वस्तू व प्रतिबिंब या दाेन आहेत का? मी तसा निराकारच आहे, पण देवांचे कार्य करण्यासाठी प्रकृतीचे साहाय्य घेऊन साकार व सगुण हाेताे.