सीमा भागात ‌‘दगडूशेठ‌’ची प्रतिष्ठापना

26 Aug 2025 14:27:46
 
sim
 
पुणे, 25 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
देशाच्या सीमेवर लढणारे जवानही गणेशाची भक्ती करतात. मात्र, जवान सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यात गणेशोत्सवात सहभागी होता येतेच असे नाही. त्यामुळे यंदा लष्करातील इन्फन्ट्री युनिटच्या जवानांना अरुणाचल प्रदेश, पठाणकोट, गुवाहाटी व राजस्थानसह सीमा भागात गणेशोत्सवात ‌‘श्रीं‌’ची प्रतीकात्मक मूर्ती स्थापन करण्यास देण्यात आल्या. सीमा भागात दगडूशेठच्या मूर्ती स्थापन करण्याची इच्छा या बटालियनच्या जवानांनी व्यक्त केली होती. ट्रस्टने या इच्छेला मान देऊन हुबेहूब 2 फुटी मूर्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार नुकत्याच या मूर्ती विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत.
 
यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे 2011 पासून संबंध आहेत. सीमेवरील लष्करी ठाण्यांत गणेशमूर्ती स्थापन केल्याने जवानांना वेगळी ऊर्जा मिळते; तसेच तेथे देशामधील सर्व राज्यांतील जवान कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व जवानांना मिळेल, अशी भावनाही जवानांनी व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0