पिंपरी-चिंचवडच्या सक्षम पाणीपुरवठ्यासाठी ॲक्शन प्लॅन राबवा : आमदार महेश लांडगे

    26-Aug-2025
Total Views |
 
 pim
 पिंपरी, 25 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 35 लाखांच्या घरात आहे. 2051 मधील शहराची लोकसंख्या सुमारे 1 कोटीच्या घरात राहील. त्यानुसार शहराला किमान 800 एमएलडी पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. परिणामी, पाणीपुरवठा नवीन जलस्रोत निर्मिती आणि सुरू असलेल्या योजना सक्षमपणे राबवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री महोदय आणि प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घ्यावी आणि ॲक्शन प्लॅन तयार करावा, अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
 
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सध्यस्थितीला शहरासाठी पवना, आंद्रा, भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध होते. पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील जैसे थे आदेश उठवण्यात आला आहे. मात्र, अद्याप काम सुरू झालेले नाही. आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे. भामा आसखेड प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. सदरचे काम गतिमान करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, वाढती लोकसंख्या आणि शहराची गरज लक्षात घेता चासकमान, ठोकरवाडी आणि मुळशी धरणातून शहरासाठी पाणी आरक्षित करण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव आहे.
 
शहरातील वाढत्या गृहनिर्माण सोसायट्यांमधून पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. त्या अनुषंगाने नवीन जलस्रोतांबाबत प्रशासनाची तयारी, सुरू असलेले पवना बंद जलवाहिनी आणि आंद्रा-भामा- आसखेड प्रकल्पाच्या कामाला गती देणे आणि शहराचा पाणीपुरवठा सक्षम करण्याबाबत जलसंपदा मंत्री, नगरविकास मंत्री यांच्यासह संबंधित विभागाचे मंत्री आणि उच्चाधिकाऱ्यांची आढावा बैठक आपल्या अध्यक्षतेखाली नियोजित करावी, अशी विनंतीही आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.