पुणे, 25 ऑगस्ट
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
गावातील पाणंद व शेताकडे जाणारे रस्ते वारंवार बंद होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. बंद झालेले पाणंद रस्ते आता उपग्रह नकाशे आणि जीआयएस कोऑर्डिनेटच्या मदतीने डिजिटल केले जाणार आहेत. त्यामुळे हे रस्ते पुन्हा बंद करता येणार नाहीत आणि मालकी हक्कावरून होणारे वादही मिटतील. हा अभिनव प्रयोग पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील 10 गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
पाणंद रस्ते मोकळे करण्याची मोहीम नेहमीच सुरू असते, मात्र ते पुन्हा बंद होण्याची साखळी थांबत नाही. आता या नव्या तंत्रज्ञानामुळे रस्ते कायमस्वरूपी खुले राहतील. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार असून, त्यांच्या शेतात जाण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग उपलब्ध होईल.
काय आहे हा अभिनव प्रयोग?
डिजिटल मॅपिंग :
स्वामित्व योजनेच्या धर्तीवर पाणंद रस्त्यांचा कायमस्वरूपी नकाशा तयार केला जाईल. एमआरसॅककडून मिळालेल्या नकाशांना रस्त्यांचे जीआयएस कोऑर्डिनेट जोडले जातील, ज्यामुळे रस्त्यांची अचूक नोंदणी होईल.
कायदेशीर स्वरूप :
भूमी अभिलेख विभागामार्फत या रस्त्यांची नोंद गाव नकाशात केली जाईल. एकदा नोंद झाल्यावर रस्ते कायमस्वरूपी रेकॉर्डवर येतील.
जलद निकाल :
डिजिटल नोंदीमुळे वाद निर्माण झाल्यास, मामलेदार न्यायालयात एक-दोन सुनावण्यांत निकाल देणे शक्य होईल.
प्रयोग यशस्वी झाल्यावर जिल्ह्यात व नंतर राज्यात राबविला जाणार
शिरूरमधील 10 गावांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात, त्यानंतर राज्यभर आणि देशभर अंमलबजावणी केली जाणार आहे.
- जितेंद्र डुडी (जिल्हाधिकारी, पुणे)