पुणे, 24 ऑगस्ट (आ.प्र.) :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टच्या जय गणेश आरोग्य सेवा अभियानांतर्गत गणेशोत्सवाच्या काळाच जय गणेश प्रांगणासह मंदिर परिसरात 3 ठिकाणी सुसज्ज अशी 24 तास मोफत वैद्यकीय मदत केंद्रे सिटी पोस्ट, गणपती मंदिर व मांगल्य मंगल कार्यालय येथे कार्यरत असणार आहेत. याशिवाय भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर (धनकवडी), सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, जहांगिर हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, सिल्व्हर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल (पिंपरी), ससून सर्वोपचार रुग्णालय, संचेती हॉस्पिटल येथे मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.
गणपती मंदिराजवळ राज्य उपसंचालक आरोग्य सेवा पुणेतर्फे 24 तास मोफत व्हेंटिलेटर/आयसीयूची 9 खाटांची सुविधा देण्यात येणार आहे. एन. एम. वाडिया हृदय रुग्णालय, पुणे स्टेशन येथे मोफत कार्डियाक रुग्णवाहिका सेवा विनामूल्य मिळणार आहे. ट्रस्टच्या 11 रुग्णवाहिका उत्सवकाळात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात विनामूल्य कार्यरत असणार आहेत. वैद्यकीय मदत केंद्रावर; तसेच रुग्णवाहिकांमध्ये मोफत औषधे देण्यात येणार असून, आरोग्यविषयक मदत भाविकांना देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती ट्रस्टने दिली आहे.
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड महापालिकेसह कँटोन्मेंट बोर्ड हद्दीतर्गत गणेशभक्तांसाठी 50 कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यात चेंगराचेंगरी, दहशतवादी वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यात अपघाती मृत्यू झाल्यास प्रतिव्यक्ती 5 लाख रुपये, अंशत: अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये आणि जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीस 50 हजार रुपयांपर्यंत औषध खर्च देण्यात येईल. उत्सवकाळात ही विम्याची सुविधा असणार आहे.