दगडूशेठ ट्रस्टच्या सजावटीचे बुधवारी उद्घाटन

25 Aug 2025 15:07:47
 
da
 
पुणे, 23 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 133व्या वर्षी गणेशोत्सवात केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरू श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री 1008 प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराजांच्या हस्ते गणेश चतुर्थीला (बुधवारी, 27 ऑगस्ट) सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी ‌‘श्रीं‌’ची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन सायंकाळी 7 वाजता होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.
 
ॠषिपंचमीनिमित्त गुरुवारी (28 ऑगस्ट) पहाटे सहाला 31 हजार महिला सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. रात्री 10 ते 12 पर्यंत हरी जागच्या माध्यमातून वारकरी बंधू वारकरी गजर करत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. उत्सवांतर्गत सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. रोज पहाटे पाचपासून महाअभिषेक पूजा होणार असून, सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत मिलिंद राहुरकर शास्त्री गणेशयाग आणि दुपारी 12 ते 4 यावेळेत दाक्षिणात्य पद्धतीने नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. भाविकांना स्वहस्ते अभिषेक पहाटे 5 ते सायंकाळी 5 यावेळेत मंडपात करता येणार आहेत.
Powered By Sangraha 9.0