वसईच्या ऐतिहासिक किल्ल्याचा दरवाजा मुसळधार पावसामुळे निखळून पडला

23 Aug 2025 16:05:16
 
वसई
 
वसई, 22 ऑगस्ट (आ.प्र.) : वसई-विरार शहरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा फटका वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यालाही बसला असून, किल्ल्याचा सागरी दरवाजा निखळला आहे. यामुळे ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या भव्य दरवाजाचे माेठे नुकसान झाले आहे.
 
वसईच्या पश्चिमेला खाडीकिनारी चिमाजी अप्पांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा असलेला ऐतिहासिक वसईचा किल्ला आहे. वसईत पाेर्तुगीज सत्ता असताना या किल्ल्यात माेठ्या प्रमाणावर बांधकाम करण्यात आले हाेते. सध्या देखभालीअभावी किल्ल्याची दुरवस्था झाली असून, यामुळे किल्ल्यातील ऐतिहासिक ठेव्यांचे माेठे नुकसान हाेत आहे. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे किल्ल्याचा सागरी दरवाजा निखळला आहे. यामुळे गेली अनेक शतके किल्ल्याचे सागरी प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भक्कम दरवाजाचे माेठे नुकसान झाले आहे.
 
सध्या हा किल्ला भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. काही ठिकाणी डागडुजी आणि इमारतींचे जतन करण्याची कामे सुरू आहेत. मात्र, पुरेशा सुरक्षेअभावी गेल्या काही वर्षांत किल्ल्यातील अनेक ऐतिहासिक पुरावे, शिल्प आदींची चाेरी झाली आहे. या सागरी दरवाजाचीही चाेरी हाेऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची मागणी किल्ले प्रेमींकडून हाेत आहे.
 
पाेर्तुगीज काळात उभारण्यात आलेल्या या किल्ल्यात वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली विविध चर्च आणि इतर ऐतिहासिक इमारती आहेत; तसेच मराठ्यांनी हा किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांनी उभारलेले वज्रेश्वरी देवीचे मंदिर आणि नागेश्वर तीर्थ ही मंदिरेही आहेत. हा किल्ला 110 एकर इतक्या विशाल परिसरात पसरलेला आहे.
Powered By Sangraha 9.0