मुंबई, 22 ऑगस्ट (आ.प्र.) : वडाळ्यात उभारण्यात येत असलेल्या जीएसटी भवनाच्या चारपैकी पहिल्या इमारतीचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या इमारतीत मुंबईत भाड्याच्या जागेत असलेली शासकीय कार्यालये स्थलांतरित करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती कक्षात जीएसटी भवनात विविध शासकीय कार्यालयांना जागा देण्याविषयी बैठक झाली. त्यावेळी पवार बाेलत हाेते. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियाेजन विभागाचे अपर मुख्य सचिव डाॅ. राजगाेपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, जीएसटी आयु्नत आशिष शर्मा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित हाेते.
जीएसटी भवनाची इमारत काॅर्पाे रेट धर्तीवर तयार करावी. या इमारतीत शासकीय कार्यालयांना जागा देताना नियमाप्रमाणे जागेचे वाटप करावे.सध्या भाड्याच्या जागेत असलेल्या कार्यालयांच्या जागेची माहिती घेऊन जागा वाटप करावे. त्यानंतर शिल्लक राहणारी जागा खासगी कंपन्यांना भाड्याने देण्याबाबत प्रस्ताव करावा. शासकीय कार्यालयांना जागा वाटपासाठी अपर मुख्य सचिव वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जीएसटी आयु्नतांची संयु्नत समिती स्थापन करावी, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.