वसई, 21 ऑगस्ट (आ.प्र.) : वसई व भाईंदर दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी राे राे सेवा चालवली जाते. सध्या काेसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही राे राे सेवा सध्या बंद करण्यात आली आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर ही सेवा पुनहा सुरू करण्यात येईल, असे येथे सांगण्यात आले.
वसई-भाईंदर या भागातील नागरिकांच्या साेयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर दरम्यान राे राे सेवा सुरू करण्यात आली आहे. सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. यांच्यामार्फत ही सेवा चालवली जाते. वसई ते भाईंदर मार्गादरम्यान अवंतिका, साेनिया आणि वैभवी, अशा 3 बाेटी चालवल्या जातात. 33 वाहने व 100 प्रवासी अशी या बाेटींची किमान क्षमता आहे. यापूर्वी राे राे सेवेच्या असणाऱ्या 9 फेऱ्यांमध्ये वाढ करून जानेवारीपासून या फेऱ्या 15 करण्यात आल्या आहेत. त्यामुळे माेटार आणि बाईक घेऊन जाणारे, तसेच इतर प्रवासी राे राे सेवेचा वापर करतात.
वसई विरार शहर परिसरात सध्या मुसळधार पाऊस हाेत आहे. पावसाचा जाेर वाढल्याने समुद्रालाही उधाण आले हाेते. भरतीच्या उंचचउंच उसळणाऱ्या लाटा थेट जेट्टीपर्यंत येऊन धडकत हाेत्या. दुसरीकडे माेठ्या प्रमाणात वादळी वाराही वाहत हाेता. समुद्राची ही स्थिती लक्षात घेऊन मंगळवारपासून ही राे राे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
भाईंदरच्या जेट्टीकडे जाणाऱ्या मार्गावरही पाणी साचले हाेते. त्यामुळे तेथेही नागरिकांना पाेहाेचणे कठीण हाेते. त्यामुळे ही राे राे सेवा बंद ठेवावी लागल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.