पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला राज्य सरकारची मंजुरी

22 Aug 2025 14:13:11
 
 mur
पुणे, 21 ऑगस्ट (प्रतिनिधी) :
 
पुणे-लोणावळादरम्यान उपनगरीय रेल्वे गाड्यांची कनेक्टिव्हिटी वाढावी आणि या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा द्यावा, यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी सुरू असलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त प्रकल्पाच्या दोन्ही मार्गिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात असलेली मागणी आता पूर्णत्वास जात आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
 
केंद्र सरकारने या प्रकल्पाला आधीच सकारात्मकता दर्शवली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने याला मंजुरी दिल्याने पुणेकरांसाठी ही मोठी भेट असणार आहे. या प्रकल्पाचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार समान करणार असून, यासंदर्भात मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री अेिशनी वैष्णवी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. तसेच, पाठपुरावाही केला होता. आता राज्य सरकारच्या मंजुरीमुळे या दोन्ही मार्गिकांचा मार्ग मोकळा झाला असून, यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‌‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या 11 वर्षांत रेल्वेचे आधुनिकीकरण आणि मार्गांचा विस्तार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे देशभरात रेल्वेचे जाळे विस्तारले असून आवश्यक तेथे मार्गिकांची संख्याही वाढवली जात आहे. अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात अशा कामांनी आणखी वेग आलेला आहे. पुणे-लोणावळ्यादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असून तिसरी आणि चौथी मार्गिका झाल्यास यादरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे.‌’ ‌
 
‘या दोन मार्गिकांमुळे रेल्वे गाड्यांची संख्याही वाढणार असून, मालगाड्यांमुळे होणारी कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच, एक्स्प्रेस गाड्यांचा वेगदेखील वाढणार आहे. याचा फायदा औद्योगिक, व्यावसायिक, नोकरदार आणि विद्यार्थी वर्गाला मोठ्या प्रमाणात होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे, असेही सांगत मोहोळ यांनी या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारचे मनः पूर्वक धन्यवाद दिले असून या प्रकल्पाची पुढील प्रक्रियाही वेगाने होईल आणि सदर प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0