झाेपडपट्ट्यांतील दुकानांना मालमत्ता कराच्या नाेटिसा

22 Aug 2025 16:00:53
 
कराच्या नाेटिसा
 
मुंबई, 21 ऑगस्ट (आ.प्र.) : मुंबई महापालिकेने झाेपडपट्ट्यांमधील गाळ्यांवर मालमत्ता कराची आकारणी सुरू केली आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या चार महिन्यांत पाच हजारांहून अधिक आस्थापनांना एकूण सात काेटी 39 लाख रुपयांची कराची बिले पाठवली आहेत. झाेपडपट्टीमधील दुकाने, गाेदामे, मालसाठा केंद्रे, साठवणगृह, गॅरेज आदी आस्थापनांना ही बिले पाठवली आहेत. यापूर्वी या ठिकाणी केवळ परवाना शुल्कासारखे व्यावसायिक शुल्क आकारले जात हाेते; मात्र व्यावसायिक मालमत्ता कर आकारला जात नव्हता.
 
महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याचा भाग म्हणून आयुक्त भूषण गगराणी यांनी फेब्रुवारीत या निर्णयाची घाेषणा केली हाेती. पालिकेच्या अंदाजानुसार या करातून दरवर्षी किमान 700 काेटींचा महसूल अपेक्षित आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत अशा 5245 मालमत्तांचा शाेध घेण्यात आला आहे. त्यापैकी 5135 मालमत्तांना कराच्या नाेटिसा दिल्या आहेत. यापैकी सुमारे 20 टक्के म्हणजेच 1120 मालमत्ताधारकांनी मालकीची माहिती सादर करून प्रतिसाद दिला आहे. या पाच हजार मालमत्तांमधून सुमारे 7.39 काेटी रुपये महसूल गाेळा हाेईल, अशी पालिकेची अपेक्षा आहे.
 
अनेक ठिकाणच्या झाेपड्या एक ते तीन मजली आहेत. यापैकी काही गाळ्यांचा व्यावसायिक वापर केला जाताे. वाढीव मजल्यांपैकी किती मजले अधिकृत आहेत, किती अनधिकृत आहेत, याविषयी स्पष्टता नाही. अनेक गाळ्यांमध्ये उद्याेगधंदे थाटले आहेत.
त्यातून संबंधित झाेपडीधारकाला नफा मिळताे. परंतु, पालिकेच्या तिजाेरीत महसुलाची भर पडत नाही.
त्यामुळे व्यावसायिक वापर करणाऱ्या झाेपडपट्ट्यांना मालमत्ता कराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.
Powered By Sangraha 9.0