मंडळांच्या वीजजोडणीसाठी ‌‘एक खिडकी सुविधा‌’

22 Aug 2025 13:55:37
 
maha
 
पुणे, 21 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
पुणे शहरातील गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीजजोडणी देण्यासाठी महावितरणने रास्ता पेठेतील कार्यालयात ‌‘एक खिडकी सुविधा‌’ उपलब्ध केली आहे. सर्व मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले आहे. मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी महापालिका किंवा स्थानिक स्वराज संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, पोलीस परवानगी, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी अहवाल आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. रास्ता पेठ पावर हाऊस येथील मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्रात शहरातील सर्व मंडळांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
 
यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश लोखंडे (मो. 7875767494) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, मंडळांनी ‌‘एक खिडकी सुविधे‌’चा लाभ घ्यावा, असे आवाहन काकडे यांनी केले आहे. गणेशोत्सव काळात वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे आदी यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचनाही महावितरणने केल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0