पुणे, 21 ऑगस्ट (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
खासगी जागेवरील झोपडपट्टीची जागा देण्याच्या मोबदल्यात जागामालकाला एक पट टीडीआर देण्याच्या गृहनिर्माण विभागाचा फायदा घेत प्राधिकरणाकडे गेल्या चार महिन्यांत एसआरएकडे चार प्रस्ताव दाखल झाले आहेत. हे प्रस्ताव मंजूर झाल्यास 32 लाख चौ.फूट टीडीआर द्यावा लागणार आहे. आरक्षणांच्या जागांच्या मोबदल्यात महापालिकेकडून वर्षभरात जेवढा टीडीआर दिला जात नाही, त्यापेक्षा काही पट जास्त टीडीआर या जागेच्या मोबदल्यात द्यावा लागणार आहे. खासगी जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी जागामालकाने एसआरएला दिल्यास त्याला टीडीआर देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे.
दाट वस्ती भागात झोपडपट्टी असेल, तर एकपट आणि विरळ वस्तीमध्ये झोपडपट्टी असेल, तर दीडपट टीडीआर देण्याची तरतूद एसआरए प्राधिकरणाच्या सुधारित नियमावलीत केली आहे. अशा प्रकरणांमध्ये मागील वर्षी 7 जूनला परिपत्रक काढून टीडीआर देण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे. या तरतुदीच्या अनुषंगाने आतापर्यंत झोपडपट्टीची जागा प्राधिकरणाच्या ताब्यात देऊन त्या मोबदल्यात टीडीआर घेण्यासाठीचे चार प्रस्ताव प्राधिकरणाकडे दाखल झाले आहेत. या चार प्रस्तावांपैकी एका प्रस्तावास प्राधिकरणाबरोबरच राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागाने अंतिम मान्यता दिली आहे, तर एक प्रस्ताव प्राधिकरणाने मान्यता दिल्यानंतर गृहनिर्माण विभागाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
उर्वरित दोन प्रस्ताव प्राधिकरणाकडे दाखल झाले असून, त्यांच्या छाननीचे काम सुरू आहे. या चारही प्रस्तावांमध्ये सुमारे 32 लाख चौरस फुटांचा टीडीआर मोबदल्यापोटी द्यावा लागणार आहे. याशिवाय येत्या काही काळात दहा ते बारा एकर जागेचे आणखी चार प्रस्ताव दाखल होण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. त्यामध्ये अशा प्रकारे काही लाख चौरस फुटांचे टीडीआर मोबदला स्वरूपात आदा करावा लागणार आहे. किमान एक कोटी चौरस फूट टीडीआर येत्या वर्षभरात प्राधिकरणाकडून मोबदल्यात स्वरूपात दिला जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी बोलून दाखविली.
पुणे शहरात खासगी जागेवर वसलेल्या झोपडपट्ट्यांची संख्या--257
पिंपरी-चिंचवड शहरात खासगी जागेवर वसलेल्या झोपडपट्ट्यांची संख्या-24
पुण्यात मिश्र मालकीच्या जागेवरील (काही जागा खासगी, तर काही जागा सरकारी मालकीची) संख्या-139