एसआरएने जागेचे मूल्यांकन सहा पटीने वाढवून दाखवले

21 Aug 2025 14:48:30
 
sr
 
पुणे, 20 ऑगस्ट
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
जनता वसाहत एसआरएसाठी टीडीआरच्या बदल्यात भूसंपादन करण्यासाठी एसआरए प्रशासनाने केवळ घाईगडबडीत प्रस्ताव मंजूर करून घेतला नाही, तर जागेचे मूल्यांकन देखील सहा पटीहून अधिक वाढवल्याचे समोर आले आहे. हिल पार्कचे आरक्षण असलेल्या या जागेचा रेडीरेकनर दर 5 हजार 720 रुपये चौ. फूट असताना मूल्यांकन करताना सिटी सर्व्हेचा दर 39 हजार 650 चौ. फूट ग्राह्य धरून या भूखंडाची किंमत 110 कोटींहून 763 कोटींपर्यंत पोहोचवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. झोपडपट्ट्यांच्या जागी पुनर्विकासाच्या योजना राबवून गोरगरीब झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर मिळवून देण्याच्या उद्दात्त हेतूने एसआरए प्राधिकरणाची स्थापना झाली. मात्र, हेच एसआरए झोपडपट्टीधारकांचे नाही, तर बांधकाम व्यावसायिकांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी कसे नियम धाब्यावर बसवते, याचा एक उत्तम नुमना आता समोर आला आहे.
 
पर्वती येथील प्लॉट न. 519, 521 अ, (जुना. स. न. 105, 107, 108, 109) या मिळकतीवर असलेल्या झोपडपट्टीची खासगी जागा 2022 च्या नियमावलीनुसार एसआरएने ताब्यात घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसार जागामालक असलेल्या मे. पर्वती लँड डेव्हलपर्स एलएलपी यांना टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याच्या प्रस्तावास गृहनिर्माण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार एसआरएने या जागेचे खरेदीखत करण्यापूर्वी जागेचे मूल्यांकन काढण्यासाठी सह-जिल्हा निबंधकांना पत्र पाठविले. त्यात त्यांनी संबंधित सर्व्हे न. आणि त्यामध्ये असलेले एकूण जागेचे क्षेत्र याची माहिती देत झोपडपट्टीव्याप्त क्षेत्र असलेल्या या जागेचे वार्षिक मूल्य तक्त्यातील दर 39 हजार 650 प्रतिचौमी. इतका असल्याचे स्पष्ट करीत त्यानुसार दस्ताची किंमत निश्चित करावी असे कळविले.
 
त्यानुसार सह-जिल्हा निबंधकांनी झोपडपट्टी क्षेत्र असलेल्या या जागेचे शासकीय नियमानुसार जागेच्या एकूण किमतीच्या 40 टक्के इतकेच मूल्यांकन करीत दस्ताची किंमत निश्चित केली. त्यानुसार संबंधित रक्कम भरून एसआरएने या जागेचे खरेदीखत केले. मात्र, ज्या सर्वे नं. 105, 107, 108, 109 यावर हा 48 एकराची जागा आहे, त्या जागेचे वार्षिक मूल्यांकन तक्त्यातील प्रत्यक्षातील रेडीरेकनर हा 5 हजार 720 रुपये प्रतिचौमी. इतका आहे. त्याकडे सोईस्कर कानाडोळा करीत आणि जागामालकांच्या घशात 763 कोटींचा टीडीआर घालून देण्यासाठी सीटी सर्व्हे नं. 661चा रेडीकनर लावून घेण्यासाठी स्वत:हून सह जिल्हा निबंधकांना पत्र पाठविले. त्यामुळे ज्या जागेची किंमत रेडीरेकनरनुसार 110 कोटींवरून थेट 763 कोटी इतकी फुगवल्याचे स्पष्ट झाले.
 
दस्ताची किंमत ठरविताना सीटी स. जुना. स. नं आणि फायनल प्लॉट यापैकी ज्यामध्ये सर्वांत रेडीरेकनर ज्याचा असेल तर ती घेऊन दस्ताची किंमत ठरविली जाते. जनता वसाहतीच्या जागेचा सीटीसर्व्हेनुसार रेडीरेकनर हा 39 हजार 650 इतका आहे. त्यानुसार दस्तांची किंमत निश्चित करण्यात आली. मात्र, पक्षकारांनी याबाबत हरकत घेतली असती आणि संबंधित जागेवर असलेले पार्कचे आरक्षण आणि एसआरए पुनर्विकास योजनेसाठी ही जागा घेतली जात असल्याचे निर्दशनास आणून दिले असते, तर त्यानुसार कार्यवाही झाली असती. मात्र, एसआरएने कोणतीही हरकत घेतली नाही. त्यामुळे आमच्या नियमानुसार काही रेडीरेकनर लावला.
-संतोष हिंगाणे (सह-जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे)
 
सह-जिल्हा निबंधक कार्यालयाकडून आलेल्या पत्रानुसार आम्ही जनता वसाहतीच्या जागेचा रेडीरेकनर लावण्यासंबंधीचे पत्र दिले. मात्र, त्यात चूक झाली. आता पुन्हा एसआरए मार्फत पार्क आरक्षणाचा रेडीरेकनर लावण्याबाबत सह-जिल्हा निबंधकांना पत्र पाठविणार आहोत.
-नितीन वाडकर (उप-अधीक्षक, भूमी अभिलेख, एसआरए प्राधिकरण, पुणे).
Powered By Sangraha 9.0