अर्जुना तयाच्या ठायीं। कामक्राेधु सहजें नाहीं। आणि भयातें नेणें नाहीं। परीपूर्णु ताे।। (2.295)

02 Aug 2025 22:55:37
 

saint 
 
याेगयुक्त पुरुषाला श्रीकृष्णांनी स्थितप्रज्ञ म्हटले आहे.हा स्थितप्रज्ञ कसा असावा हेही स्पष्ट केले आहे. ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे व जाे समाधिसुखाचा अनुभव घेताे ताे कसा ओळखावा? असा प्रश्नच अर्जुनाने विचारला आहे. भगवंता, त्याचे रूप कसे असते? त्याची स्थिती कशी असते? हे सर्व मला स्पष्ट करावे. हे ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आपल्या चित्तातील विषयसुख भाेगण्याची इच्छा आपल्या आत्मसुखाच्या आड येताे. खरे पाहता जीव नित्य सुखस्वरूपच आहे. ताे नित्यतृप्त आहे.आत्मसुख त्याच्या अंत:करणात भरून आहे.पण विषयसुखाची ही वासना नाहीशी करून ज्या पुरुषाचे चित्त आत्मसुखात लीन हाेते त्यालाच स्थितप्रज्ञ म्हणावे.
 
नाना प्रकारची दु:खे प्राप्त झाली तरी चित्तात खिन्नता प्राप्त हाेत नाही, जाे सुख प्राप्त व्हावे अशा इच्छेत अडकून पडत नाही, ताे अर्जुना भयरहित हाेऊन आत्मरूप बनताे. त्याच्या ठिकाणी स्वाभाविक असा क्राेध उरत नाही. विषयभाेगाची इच्छा रहात नाही.त्याच्या मनाची ही जी अविनाशी व उपाधिरहित स्थिती असते तीवरूनच त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. पाैर्णिमेचा चंद्र प्रकाश देताना जसा भेद करीत नाही.तसा ताे सर्व भूतमात्रांशी सारखाच वागताे.त्याची समदृष्टी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समान व दयार्द्र असते. मनाजाेगे झाले की ताे आनंदित हाेत नाही किंवा मनाविरुद्ध झाले की दु:खी हाेत नाही.असा हर्षशाेकरहित, आत्मबाेधभरीत पुरुष म्हणजे स्थितप्रज्ञ हाेय. कासवाप्रमाणे ताे आपली इंद्रिये स्वाधीन ठेवताे म्हणूनच त्यास स्थितप्रज्ञ म्हणतात. (क्रमशः)
Powered By Sangraha 9.0