महामुद्रातील इतिहास भविष्यातील पिढीसाठी उपयुक्त

02 Aug 2025 13:58:09
 
 mah
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट (आ.प्र.) 
 
 ‌‘केंद्रातील मराठी मंत्र्यांनी देशासाठी, महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांचा इतिहास हा भविष्यातील पिढीसाठी खूप उपयोगाचा ठरेल. महामुद्राच्या निमित्ताने सर्व नेत्यांचे कार्यकर्तृत्व भविष्यातील पिढीला नक्कीच प्रेरणा देत राहील,‌’ अशी भावना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे ‌‘सरहद‌’ने आयोजिलेल्या कार्यक्रमात पुणे सकाळचे वृत्तसंपादक धनंजय बिजले लिखित ‌‘महामुद्रा‌’ या पुस्तकाचे प्रकाशन नितीन गडकरी आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते गडकरी यांना चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 
या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, नागपूरच्या वनराई फाऊंडेशनचे डॉ. गिरीश गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ‌‘महामुद्राच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतिहासात भरीव कामगिरी केलेल्या नेत्यांची माहिती एकत्रितरित्या पुढे आली आहे. खूप मोठे योगदान असलेल्या या मंत्र्यांच्या कामांचा सखोल अभ्यास केला पाहिजे. त्या प्रत्येकावर स्वतंत्र पुस्तक काढले तर त्यांचे कार्य, व्हिजन, कर्तृत्व, निर्णयक्षमता ही भविष्यातील पिढीला उत्तम दिशा देईल. स्वातंत्र्यानंतर दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे यशस्वीपणे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, काकासाहेब गाडगीळ आणि डॉ. सी. डी. देशमुख हे नेहरूंच्या मंत्रिमंडळातील सदस्य होते.
 
नेहरूंच्या मंत्रिमंडळात असताना त्यांनी देशासाठी जेवढे मोलाचे कार्य केले, तेवढेच महाराष्ट्रासाठीही केले. नंतरच्या काळात केंद्रात मंत्री असताना यशवंतराव चव्हाण, शरद पवार, मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस यांनीही महाराष्ट्राच्या हिताचे संवर्धन केले. मराठी माणूस, संस्कृती, इतिहास, नाटक, अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयात आहेत.‌’ या प्रसंगी बोलताना शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात महाराष्ट्रातील नेत्यांच्या दिल्लीतील कर्तृत्वाचे अनेक दाखले दिले. ‌‘महामुद्रा‌’ पुस्तकामध्ये काकासाहेब गाडगीळ, सी. डी. देशमुख, मधू दंडवते यांच्याविषयी लिहिलेल्या कार्याचा उल्लेख केला.
 
‌‘महामुद्रा‌’त दिल्लीतील मराठी नेतृत्वाचे कर्तृत्व
दिल्लीमध्ये मराठी नेत्यांनी बजावलेल्या दैदिप्यमान कामगिरीची एकत्रित मांडणी ‌‘महामुद्रा‌’ या पुस्तकात करण्यात आली आहे. हे पुस्तक दोन खंडांमध्ये प्रकाशित होणार आहे. पहिल्या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब मावळणकर, काकासाहेब गाडगीळ, यशवंतराव चव्हाण, सी. डी. देशमुख, शंकरराव चव्हाण, मधू दंडवते, वसंत साठे, शरद पवार, शिवराज पाटील, मोहन धारिया, राम नाईक, विठ्ठलराव गाडगीळ, सुशीलकुमार शिंदे आणि नितीन गडकरी या नेत्यांची कामगिरी शब्दबद्ध केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे.  
Powered By Sangraha 9.0