जिल्ह्यात अपना भांडार उभारावे; पणन मंत्री रावल यांची सूचना

19 Aug 2025 22:41:18
 

rawal 
राज्यात महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहकांचा लाभ व्हावा, या उद्देशाने ‘अपना भांडार’ या नावाने बहुउद्देशीय ग्राहक भांडार चालवली जातात. भविष्यात सर्व जिल्ह्यांत अशी भांडार उभारून खरेदी- विक्रीची साखळी उभारण्यात येईल, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी जाहीर केले.महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या कामकाजाचा रावल यांनी महासंघाच्या कार्यालयात आढावा घेतला. या वेळी महासंघाच्या प्राधिकृत समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव भाेसले, कार्यकारी संचालक विकास रसाळ, महासंघाचे संचालक जयसिंग गिरासे, संचालक गाेकुळ परदेशी यांच्यासह संबंधित पदाधिकारी, अधिकारी उपस्थित हाेते.
 
महासंघाच्या मालकीच्या जागांचा पुनर्विकास करून त्या सुस्थितीत करून घेणे गरजेचे आहे. जेथे भाडेतत्त्वावर जागा आहेत त्यांची मालकी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालय, बाजार समिती, बचत गटांसाठी उभारले जाणारे माॅल्स आदी ठिकाणी अपना भांडार सुरू करावेत.तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांना सहभागी करून घ्यावे. राज्यात ग्राहक महासंघाच्या माध्यमातून खरेदी-विक्रीची प्रभावीसाखळी तयार करून राज्यात ब्रँड निर्माण करावा, अशी सूचनाही रावल यांनी केली.
राज्यातील ग्राहक भांडारांना ऊर्जितावस्था मिळावी, ज्या संस्था उत्कृष्ट काम करत आहेत त्यांचे काम इतरांना प्रेरणादायी ठरावे, या उद्देशाने सर्व ग्राहक भांडारांचा मेळावा सप्टेंबरमध्ये नाशिकमध्ये घ्यावा, असे निर्देश रावल यांनी महासंघाला दिले.
Powered By Sangraha 9.0