शंभर दिवस कार्यक्रमांत महावितरणला तीन प्रमाणपत्रे

19 Aug 2025 14:10:18
 
sha
 
कल्याण, 18 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
राज्य शासनाने राबवलेल्या 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत केलेल्या कामांची दखल घेऊन राज्य शासनाने महावितरणच्या तीन कार्यालयांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरवले आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही प्रमाणपत्रे स्वीकारली. राज्य पातळीवर स्पर्धेत कोकण प्रादेशिक कार्यालय कल्याणला दुसरा क्रमांक, विभागीय पातळीवर कल्याण परिमंडळ कार्यालयाचा तिसरा क्रमांक, तर जिल्हा पातळीवर कल्याण मंडळ कार्यालय-1चा पहिला क्रमांक आला.
 
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समारंभात महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अलोक गांगुर्डे यांनी कोकण प्रादेशिक कार्यालयाकडून कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी परिमंडळ कार्यालयाच्या वतीने, तर अधीक्षक अभियंता विजय फुंदे यांनी कल्याण मंडळ कार्यालयाच्या वतीने शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0