काकाची शिकवणी व फाटके माेजे

18 Aug 2025 15:46:25
 

Kaka 
 
जितेंद्र हा गिरगावातल्या मराठी चाळीत वाढलेला पंजाबी मुलगा.सामान्य परिस्थितीतला. ताे सिद्धार्थ काॅलेजात शिकला, त्याच्याच काॅलेजातला समवयस्क राजेश खन्ना केसी काॅलेजात हाेता. दाेघे शालेय वयापासून मित्र. वडिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी जितेंद्रने व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये हरकाम्याची नाेकरी पत्करली. त्यात ताे पडेल ते काम करायचा आणि सिनेमात गर्दीतल्या अनेक व्यक्तिरेखा साकारायचा, पासिंग शाॅट द्यायचा. मराठी संस्कार असलेला मेहनती पंजाबी युवक म्हणून शांतारामबापूंना त्याचं काैतुक हाेतं.
 
त्यांनी ‘गीत गाया पत्थराेनें’ या सिनेमात आपली मुलगी राजश्री हिचा नायक म्हणून त्याला ब्रेक द्यायचं ठरवलं. त्यासाठी त्याची स्क्रीन टेस्ट घ्यायचं ठरवलं. जितेंद्रने लगेच काकाला म्हणजे राजेश खन्नाला गाठलं. त्याला नाटकांतल्या अभिनयाचा अनुभव हाेता. त्याने आपल्या नाटकांमधले काही संवाद रवीकडून घटवून घेतले. पण, स्क्रीन टेस्टच्या वेळी बापूंनी त्याला त्यांच्या सिनेमातलेच संवाद बाेलायला सांगितले, तेही बापूंच्या काेल्हापुरी ऊर्दूच्या ढंगात. यह वह असे पूर्ण उच्चार करीत. ते दिव्य कसंबसं पार पाडत असताना जितेंद्रच्या लक्षात आलं की नायिका राजश्री आपल्या चेहऱ्याकडे कमी आणि पायाकडे जास्त पाहते आहे. सेटवर बूट काढून ठेवायला लागले हाेते. राजश्रीला त्याचे फाटके माेजे दिसत हाेते. ती त्याच्यावर हसत हाेती.
 
 
Powered By Sangraha 9.0