दिलीप सरदेसाई हे 1960च्या दशकाच्या सुरुवातीला उदयाला आलेले बॅट्समन. त्यांनी दहा वर्षं गाजवली. ते फिरकी गाेलंदाजी खेळण्यात उस्ताद हाेते. त्यांनी मुंबईकडून 10 वेळा रणजी खेळली, त्यातल्या एकाही वेळेला मुंबई रणजी सामना हरली नाही. हा एक वेगळाच विक्रम. सरदेसाई यांचं करिअर उतरणीला लागलं आहे, असं वाटल्याने निवड समितीचे अध्यक्ष असलेले माजी कर्णधार, थाेर फलंदाज विजय मर्चंट हे त्यांना 1971 साली वेस्ट इंडीजच्या दाैऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात घ्यायला उत्सुक नव्हते. साेळावा खेळाडू म्हणून कर्णधार अजित वाडेकरच्या आग्रहाखातर त्यांनी नाइलाजाने सरदेसाईंचा समावेश केला.
वेस्ट इंडीजच्या चार सर्वश्रेष्ठ वेगवान गाेलंदाजांच्या ताेफखान्यासमाेर अख्ख्या जगाने नांगी टाकलेली असताना भारतीय फलंदाज टिच्चून उभे राहिले आणि भारताने मालिका जिंकली. या मालिकेत सर्वाधिक काैतुक झालं ते सुनील गावसकरचं. त्याने कमालच केली हाेती. सर्वाधिक स्काेअर त्यानेच केला हाेता. पण, सरदेसाई यांनी तब्बल 642 धावा ठाेकल्या हाेत्या. वेस्ट इंडीजला विमानतळावर तुम्ही काही आणलंय का, अशी विचारणा कस्टम इमिग्रेशनवाल्यांनी केल्यावर, मी धावा आणल्या आहेत आणि आणखी धावा घेऊन जाणारआहे, असं उत्तर सरदेसाईंनी दिलं हाेतं, ते खरं करून दाखवलं आणि मर्चंट यांनीच त्यांना रेनेसान्स मॅन अशी पदवी दिली.