मेडिसिटी’ हा महत्त्वाकांक्षी आराेग्य प्रकल्प असून, या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नागपूरला देशातील प्रमुख वैद्यकीय केंद्र बनवणे, तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आराेग्य सुविधा उपलब्ध करून केवळ विदर्भातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळावेत, हा आहे. या मेडिसिटीत विविध सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल, रिसर्च सेंटर्स, वैद्यकीय शिक्षण संस्था आणि इतर आराेग्य सुविधांचा समावेश असणार आहे. या मेडिसिटीच्या निर्माणासाठी मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस प्रा. लि. आणि टेमासेकने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.मुख्यमंत्री फडणवीस आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम याेंग यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबईतील ऐराेलीत कॅपिटालँड डेटा सेंटरचे उद्घाटन झाले.
त्यावेळी मुख्यमंत्री बाेलत हाेते. यावेळी सिंगापूरचे परिवहन मंत्री जेफरी सिओ, कॅपिटालँड इंडिया ट्रस्टचे अध्यक्ष मनाेहर खैतानी, कॅपिटालँड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव दासगुप्ता, मुख्यमंत्र्यांचे मुख्य गुंतवणूक सल्लागार काैस्तुभ धवसे, उद्याेग विभागाचे सचिव डाॅ. पी. अनबलगन, काेकण विभागीय आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी, ठाण्याचे जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, नागपूरचे जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डाॅ. कैलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित हाेते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की ‘स्टेट ऑफ आर्ट’ अशा प्रकारच्या कॅपिटालँडच्या डेटा सेंटरचे उद्घाटन झाले आहे.
‘टेक्नाॅलाॅजी व्हाॅईस अॅडव्हान्स’ अशा प्रकारचे हे डेटा सेंटर असून, त्यात वेगवेगळ्या प्रकारे अतिशय चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. आपण ज्या डिजिटल अर्थव्यवस्थेत आहाेत, त्याच्यात प्रत्येक गाेष्टीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला डेटा सेंटरची आवश्यकता पडते. म्हणून देशात ही क्षमता उभी राहणे महत्त्वाचे आहे.नवी मुंबई हे भारतातील एक महत्त्वाचे डिजिटल केंद्र बनत आहे. मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरूसारख्या शहरांसाेबत हे केंद्र भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करत आहे.कॅपिटालँड पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात 2 अब्ज डाॅलर्सपेक्षा (सुमारे 16600 काेटी रुपये) जास्त गुंतवणूक करेल, असे गन किम याेंग यांनी सांगितले.दासगुप्ता यांनीही मनाेगत व्यक्त केले.