विसर्जनासाठी 99 ठिकाणी कृत्रिम तलाव

15 Aug 2025 21:53:36
 
 

Ganesh 
नैसर्गिक तलाव प्रदूषित हाेऊ नयेत व पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा व्हावा यासाठी यावर्षीही वसई विरार महापालिका कृत्रिम तलाव उभारणार आहे. नऊ प्रभागांत 99 ठिकाणी कृत्रिम तलावांचे नियाेजन केले असून, फिरते तलावही ठेवले जाणार आहेत. पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल हळूहळू वाढत आहे. त्यामुळे यंदाही प्रत्येक प्रभागात कृत्रिम तलाव उभारण्यासाठी पालिकेने सकारात्मकता दाखवली आहे.गणेशाेत्सव काळात गणेशमूर्तींचे विसर्जन नदी, तलाव किंवा समुद्राच्या ठिकाणी केले जाते. दिवसेंदिवस गणेशमूर्तींची संख्या ही वाढत आहे. या वाढत्या संख्येमुळे तलावातील पाणी प्रदूषित हाेऊ लागले आहे. हे प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलावांची संकल्पना पुढे आली आहे. गेल्या दाेन वर्षांपासून पालिकेने कृत्रिम तलाव उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावर्षीही शहरात कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागाच्या ठिकाणी पाहणी करून करून प्रभागनिहाय जागा निश्चित केल्या आहेत.नऊ प्रभागांत पालिका 99 कृत्रिम तलाव उभारणार आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपल्या गणेशमूर्ती प्रत्यक्ष तलावात विसर्जित न करता कृत्रिम तलावात विसर्जन कराव्यात. विसर्जनासाठी फिरते हाैदही तयार करण्यात येणार आहेत.
Powered By Sangraha 9.0