कर संकलन विभागाची ऑनलाइन सेवा नागरिकांसाठी उपयुक्त

13 Aug 2025 14:33:44
 
 ka
पिंपरी, 12 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेने मालमत्ताकर थकबाकी नसलेला दाखला घरबसल्या मिळावा यासाठी मार्च 2022 पासून ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीत 13,213 नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. यापूर्वी नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागे. अनेक वेळा कार्यालयात फेरफटका मारावा लागत असल्यामुळे नागरिकांना वेळ आणि श्रमाचा अपव्यय होत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी कर आकारणी विभागाने महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.
 
2022 ते जुलै 2025 पर्यंत एकूण 64 हजारांहून अधिक नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने थकबाकी नसल्याचा दाखला घेतला आहे. ही सेवा सुरू झाल्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आता ते घरबसल्या विनाशुल्क दाखला डाउनलोड करू शकतात.
 
महापालिकेच्या कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नागरिकांना घरबसल्या सेवा मिळाव्यात यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. मालमत्ताकर विभागाने सुरू केलेली थकबाकीदार नसल्याच्या ऑनलाइन दाखल्याची सुविधा हा त्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. नागरिकांचा वेळ वाचावा, त्यांना कोणतीही अडचण न येता आवश्यक कागदपत्रे सहज मिळावीत, हाच आमचा उद्देश आहे.
- प्रदीप जांभळे पाटील (अतिरिक्त आयुक्त, महापालिका)
 
थकबाकीदार नसल्याचा दाखला ऑनलाइन मिळू लागल्यामुळे नागरिकांची खूप मोठी गैरसोय टळली आहे. आधी लोकांना कार्यालयात यावे लागायचे, वेळ जात होता. नागरिक घरबसल्या ही सेवा वापरत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. ही सुविधा आणखी सोपी आणि उपयुक्त कशी करता येईल यावर आमचा भर आहे.
- अविनाश शिंदे (सहायक आयुक्त, कर संकलन विभाग, महापालिका)
 

ka 
Powered By Sangraha 9.0