स्वधर्माचे आचरण करावे म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार उपदेश करताना दिसतात. आपली सर्व शरीरयात्राच स्वधर्माने चालू असते. स्वधर्मामुळेच इंद्रिये स्वैर वागत नाहीत.मत्स्यादि जलचर प्राणी ज्याप्रमाणे पाण्याशिवाय टिकू शकत नाहीत, त्याप्रमाणे स्वधर्माशिवाय मनुष्य सुखाने राहू शकत नाही. म्हणून स्वधर्म साेडू नका, असे श्रीकृष्ण अर्जुनास पुन्हापुन्हा सांगतात. असा स्वधर्म आचरल्यानंतर कशाची प्राप्ती हाेईल? या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीकृष्ण सांगतात की, जाे काेणी विहित स्वधर्मआचरेल त्याला सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त हाेईल. असा हा पुरुष गुरू, बांधव, अग्नी, ब्राह्मण, पितर, इत्यादींची सेवा करीत असताे. यांना आहुती देऊन जे काही उरेल त्याचे सेवन करणे हाही स्वधर्मच आणि हे सेवन मग आपल्या बंधुबांधवांसहकरण्यास हरकत नाही. असा भाेग घेण्याने भाेग घेतल्याचा दाेष लागत नाही.
ज्याप्रमाणे अमृताचे सेवन केल्यावर महाराेगीही बरा हाेताे, त्याप्रमाणे यज्ञात हवन केल्यानंतर उरलेले अन्न सेवन केल्यावर सर्व दाेष नाहीसे हाेतात. आत्मानुभव घेणारा मनुष्य ज्याप्रमाणे भ्रांतीने ग्रासला जात नाही त्याप्रमाणे यज्ञातील उरलेला भाग सेवन केल्यामुळे यज्ञकर्ता दाेषी ठरत नाही. म्हणून स्वधर्माने जे मिळविले ते आपण स्वधर्मात खर्च करावे आणि उरलेले आनंदाने भाेगावे हे गीतेचे एक तत्त्व आहे. सर्व संपत्ती मिळाली तरी त्याचे धनी आपण नाही, ती इतरांची आहे असे भान ठेवण्यास गीता आवर्जून सांगते. म्हणून श्रीकृष्ण सांगतात की, अर्जुना, तू असा भलत्या मार्गाने जाऊ नकाेस, जे पुरुष देहालाच मी समजतात, विषय हे भाेगण्यासाठी आहेत, असे मानतात त्यांना काहीच हाती लागत नाही. अर्जुना, ही सर्व संपत्ती यज्ञसामग्री मानावी आणि स्वधर्मास स्मरून ती परमेश्वरास अर्पण करावी.