पिंपरी, 11 ऑगस्ट (आ.प्र.) :
महापालिकेच्या सत्तेतून हद्दपार होऊन बॅकफूटवर गेलेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक झाला आहे. महापालिकेच्या डीपीविरोधात महामोर्चा काढून राष्ट्रवादीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यातून सत्ताधारी भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पिंपरी-चिंचवडची राजकीय हवा पालटल्याने पुन्हा सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
महापालिकेत भाजप सत्तेत असल्याने राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी कोमात गेल्याची चर्चा होती. भाजप सत्तेत असल्याने शहरात राष्ट्रवादीचे अस्तित्व दिसून येत नव्हते. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी अजित पवार यांची साथ सोडत 20 ते 25 माजी नगरसेवकांना घेऊन शरदचंद्र पवार पक्षाची वाट धरली होती. पक्षफुटीमुळे पक्षात कोणी राहिले नसल्याने पक्ष मोडकळीत आला होता. शहराच्या इतिहासात प्रथमच अनेक महिने पक्षाचे शहराध्यक्ष पद रिक्त होते, ही पक्षासाठी मोठी नामुष्की होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री झाल्याने पक्षाला बळ मिळाले. महापालिका निवडणुकीत महायुती होणार की स्वबळावर लढणार, याचे दावे-प्रतिदावे करण्यात आले. महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी हे प्रमुख दोन पक्ष आमनेसामने आले आहेत. तब्बल नऊ वर्षे सत्तेबाहेर राहिल्याने पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते सत्ता मिळविण्यासाठी सरसावले आहेत. पक्षात नवीन उत्साह वाढविण्यासाठी डीपीविरोधात महापालिकेवर महामोर्चा काढण्यात आला.
निवेदन स्वीकारण्यासाठी महापालिकेचे आयुक्त हजर नसल्याने विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. उपाध्यक्ष येणार, याची आयुक्तांना कोणतीही कल्पना नव्हती. त्यामुळे ते विभागीय आयुक्तांच्या बैठकीस गेले होते. उपाध्यक्ष मोर्चासोबत आल्याने आयुक्त न असल्याने राजशिष्टाचार राखला गेला नाही, असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. आयुक्त नसल्याच्या मुद्दा राष्ट्रवादीने लावून धरला आहे. दुसरीकडे भाजपसाठी डीपीचा मुद्दा संपला आहे. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचे स्थानिक पदाधिकारी व आमदारांनी स्पष्ट केले आहे. डीपीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे.
शहरातील चिखलीनंतर चऱ्होली भागात टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे रद्द केला; तसेच आळंदी तीर्थक्षेत्राशेजारील मोशी भागातील कत्तलखान्याचे आरक्षणही मुख्यमंत्र्यांनी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे स्थानिक भाजपत जोश आहे. आता भाजपला पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. प्रभागनिहाय बैठकांचे सत्र सुरू असून, उमेदवारांची नावे निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने मोर्चबांधणी केली जात आहे.