सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार

11 Aug 2025 14:17:22
 
sol
 
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
सोलापूरचे प्रख्यात हातमाग कारागीर राजेंद्र अंकम यांना हातमाग क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 11व्या राष्ट्रीय हाथकरघा दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित समारंभात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोलापूरचे राजेंद्र अंकम गेल्या 48 वर्षांपासून पारंपरिक विणकराच्या रूपात हातमाग कला जोपासत आहेत. त्यांनी आपल्या वडिलांकडून विणकामाचे कौशल्य आत्मसात करून, 100 विणकारांना प्रशिक्षण देऊन या कलेला नवसंजीवनी दिली आहे. त्यांच्या कार्याने सोलापूरच्या हातमाग उद्योगाला नवे आयाम मिळाले असून, नवीन पिढीला प्रेरणा मिळाली आहे.
 
या कार्यक्रमात 24 उत्कृष्ट कारागिरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात 6 महिला आणि एका दिव्यांग कारागिराचा समावेश आहे. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्र मार्गेरिटा, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन जयंतीभाई बांभनिया, खासदार कंगना रनौत, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव, अतिरिक्त सचिव रोहित कंसल, हाथकरघा आयुक्त डॉ. एम. बीना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0