प्रारूप प्रभागरचनेत हस्तक्षेपाचा विरोधकांचा आरोप राजकीय

11 Aug 2025 14:09:14
 
mah
 
पुणे, 10 ऑगस्ट (शैलेश काळे यांजकडून) :
 
महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभागरचना करताना सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप महाविकास आघाडीतील पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र, त्याचवेळी महापालिकेत प्रमुख विरोधकाची भूमिका बजावणारा; परंतु सध्या महायुतीमध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कुठलाही आक्षेप नोंदवलेला नाही. विशेष असे की, या तीनही पक्षांतील मागील सभागृहातील सदस्यसंख्या ही जवळपास 141 आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडे उरलेल्या आणि शहरात भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या प्रभागांमध्ये फारसा हस्तक्षेप करण्याची गरज सत्ताधारी महायुतीला आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
 
महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा नुकताच शासनाला सादर झाला आहे. हा आराखडा तयार करताना सत्ताधारी भाजपने दबावतंत्राचा वापर करून हा आराखडा तयार केल्याचा आरोप महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी केला. एवढेच नव्हे, तर महापालिका आयुक्तांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करताना प्रारूप प्रभागरचनेचे काम सुरू असताना भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली मात्र महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना भेट नाकारत असल्याचाही आरोप केला.
 
दरम्यान, सध्या केंद्र, राज्य आणि 2017 चे महापालिकेतील पक्षीय बलाबल, समाविष्ट 32 गावांतील सर्वच राजकीय पक्षांची ताकद याचा विचार करता महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच पक्षीय बलाबल सवार्िधक आहे. 2017 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत 162 नगरसेवकांसाठी चारसदस्यीय 39 व तीनसदस्यीय 2 प्रभाग होते. यानंतर 11 गावांचा समावेश झाल्यानंतर दोनसदस्यीय एकच प्रभाग करण्यात आल्याने नगरसेवकांची संख्या 164वर पोहोचली. 2021 मध्ये नव्याने 23 गावांचा समावेश झाला, तर नुकतेच जाहीर झालेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमाअंतर्गत नगरसेवकांची संख्या 165 होणार आहे.
 
राज्यातील नवीन समीकरणांनुसार महायुतीमध्ये भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहेत. 2017 मध्ये भाजपचे 100, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर 42 नगरसेवकांपैकी जवळपास 33 नगरसेवक अजित पवार यांच्यासोबत गेले. केवळ आठच नगरसेवक शरद पवार गटात राहिले. शिवसेनेच्या फुटीनंतर एकमेव नगरसेवक शिंदे गटात गेला; परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रत्येकी एक नगरसेवक शिंदे गटात गेला, तर पाच नगरसेवक भाजपात गेले. काँग्रेसच्याही नगरसेवकांची संख्या आवक जावक झाल्यानंतरही जेमतेम दहावरच मर्यादित राहिली.
 
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मनसेच्या एका नगरसेवकाची एंट्री झाल्याने केवळ चारच नगरसेवक शिल्लक राहिले आहेत. एकंदर विचार केला तर भाजप आणि मित्रपक्षांकडील महायुतीच्या नगरसेवकांची संख्या 141वर पोहोचली आहे, तर महाविकास आघाडीकडे जेमतेम 23 नगरसेवक आहेत. महाविकास आघाडीकडे उरलेल्या नगरसेवकांची संख्या ही संपूर्ण शहरात विखुरली आहे. त्यातही पुणे स्टेशन-ताडीवाला रोड येथील सध्याच्या एका प्रभागात काँग्रेसचे तीन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवक आहे.
 
महाविकास आघाडीच्या ताब्यात संपूर्ण एक प्रभाग असला असता तर त्यांना शह देण्यासाठी कदाचित जाणीवपूर्वक प्रभागरचना फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय घ्यायला जागा होती. बहुतांश प्रभागांमध्ये महायुतीच्याच नगरसेवकांचा वरचष्मा आहे, तर मोजक्या ठिकाणी अर्थात केवळ तीनच प्रभागांत दोन्ही आघाड्यांचे प्रत्येक दोन नगरसेवक आहेत. त्यामुळे प्रभागरचना करताना मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप झाल्याचा महाविकास आघाडीचा दावा हा केवळ राजकीय आहे, असे जाणकार सांगतात.
Powered By Sangraha 9.0