मुंबई, 10 ऑगस्ट (आ.प्र.) :
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील 149 दुकानांच्या विक्रीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. मुंबई मंडळाने गुरुवारी ई लिलावाची अधिकृत घोषणा करत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 149 दुकानांच्या ई लिलावासाठीची नोंदणी, अर्जविक्रीस्वीकृ ती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 29 ऑगस्टला ई लिलावाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या ई लिलावात मुंबई मंडळाच्या बोलीपेक्षा सर्वाधिक बोली लावणारा अर्जदार दुकानांसाठी विजेता ठरणार असून, त्या पात्र विजेत्यास दुकानाचे वितरण केले जाणार आहे. म्हाडाच्या प्रत्येक प्रकल्पात रहिवाशांच्या सोयीसाठी काही दुकाने बांधली जातात.
गिरणी, औषध दुकान, भाजीपाल्याचे दुकान आणि इतर दुकानांचा यात समावेश असतो. बँक, एटीएमचाही समावेश असतो. या दुकानांची विक्री मंडळांकडून ई लिलावाद्वारे केली जाते. मंडळाकडून नियमानुसार दुकानाच्या क्षेत्रफळानुसार एका बोली निश्चित केली जाते. या बोलीपेक्षा सर्वाधिक बोली लावणारा अर्जदार ई लिलावात विजेता ठरतो. त्यानंतर पुढील कार्यवाही करत त्याला दुकानाचे वितरण केले जाते. मुंबईत निवासी गाळ्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशावेळी म्हाडाच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात दुकाने खरेदी करता येतात. दुकानांच्या ई लिलावाकडे अनेकांचे लक्ष असते. त्यानुसार मागच्या वर्षी मुंबईतील 173 दुकानांचा ई लिलाव मुंबई मंडळाने केला होता.
मात्र, दुकानांच्या किमती अधिक असल्याने आणि दुकान काही विशिष्ट वापरासाठी राखीव असल्याने मागच्या वर्षी दुकानांच्या ई लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. मागच्यावेळी 173 दुकानांपैकी केवळ 49 दुकानांची विक्री यावेळी झाली होती, तर 124 दुकाने रिक्त राहिली होती. दुकानांच्या किमती अधिक असल्याने आणि वापराची अट जाचक असल्याने मंडळाने किमती कमी करून दुकानांच्या वापराची अट शिथिल केली. दुकानांसाठी निवासी मालमत्तेच्या रेडीरेकनर दराच्या दोन पट किंवा अनिवासी मालमत्तेच्या रेडीरेकनर दराच्या एक पट यात जो दर अधिक असेल तो दर लागू करत किंमत, बोली निश्चित केली जाते. आता 149 दुकानांतील 124 जुन्या दुकानांच्या किमतीत, बोलीत मंडळाने घट केली आहे. या दुकानांसाठी निवासी मालमत्तेच्या रेडीरेकनर दराच्या दीडपट दराने बोली लावण्यात आली आहे. त्यामुळे आता परवडणाऱ्या दरात दुकाने खरेदी करता येणार आहेत.
या ई लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाईन 12 ऑगस्टला दुपारी 12 पासून भरता येणार आहे. 25 ऑगस्ट रात्री 11.59 पर्यंत नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू राहणार आहे. 28 ऑगस्टला सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत संगणकीय प्रणालीत पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाईन बोली स्वरूपातील ई लिलाव http://www. eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे.त्यानंतर 29 ऑगस्टला सकाळी 11 वाजता https://eauction.mhada.gov.in व https:// mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.