डॉ. इनामदार यांना बेस्ट लिफ्टर इंडियासह दुहेरी मुकुट

11 Aug 2025 14:32:00
 
 dr
 
पुणे, 9 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
व्ही. के. कृष्णमेनन इंडोर स्टेडियम कोझिकोड येथे नुकत्याच 2 ते 7 ऑगस्टदरम्यान मास्टर क्लासिक व इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. देशभरातील सुमारे 560 खेळाडूंनी यात सहभाग नोंदवला. गेल्या 30 वर्षांतील सर्वांत उच्चांकी खेळाचे प्रदर्शन या स्पर्धेदरम्यान बघावयास मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी या स्पर्धेत क्लासिक व इक्विप्ड या दोन्ही प्रकारांत विजयश्री खेचून आणली. गोवा, तेलंगणा, ओडिसा, मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, दिल्ली, छत्तीसगड आदी राज्यांच्या खेळाडूंशी चुरशीची लढत देत त्यांनी महाराष्ट्रासाठी सात सुवर्णपदके व एक रजत पदकांची कमाई केली.
 
महिलांच्या 57 किलो वजनी गटात दुहेरी मुकुट पटकावत त्यांनी मानाचा बेस्ट लिफ्टर ऑफ इंडिया म्हणजेच स्ट्राँग वूमन ऑफ इंडिया हा किताब आठव्यांदा पटकवला. पती डॉ. वैभव इनामदार यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. 10 ते 19 ऑक्टोबर दरम्यान केप टाऊन-साऊथ आफ्रिका येथे होणाऱ्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी त्यांची निवड झाली आहे. आई-वडील, कुटुंबीय व मित्रपरिवार यांच्या पाठिंब्यामुळेच पुन्हा पुन्हा उच्च पातळीवरचे यश नोंदवणे शक्य होते, असे डॉ. शर्वरी इनामदार यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0