सौर प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यास कारवाई : मुख्य सचिव

11 Aug 2025 14:02:02
 
 sao
 
पुणे, 10 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत पुणे जिल्ह्यात 1083 मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पांचे काम सुरू असून, त्यासाठी 7 कंपन्या (एजन्सी) काम करत आहेत. या कंपन्यांनी आपल्या कामांचा वेग वाढून प्रकल्प वेळेत कार्यान्वित करावेत. अन्यथा त्यांना पुढील 5 वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशारा ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी दिला. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‌‘टास्क फोर्सफ‌’च्या बैठकीत शुक्ला बोलत होत्या.
 
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, महावितरणचे संचालक योगेश गडकरी, राजेंद्र पवार, प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. दीड वर्षांपूर्वी 7 कंपन्यांना 1083 मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांचे कार्यादेश दिले होते. यातील 36 मेगावॉटचे प्रकल्प आवादा कंपनीने पूर्ण केले आहेत. अनेक कंपन्यांचे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. सप्टेंबरपर्यंत बरेच प्रकल्प पूर्ण होतील. परंतु, काही कंपन्यांचे काम संथ गतीने सुरू असल्याने त्यांनी कामाची गती वाढवावी. अन्यथा त्यांच्यावर निविदेतील तरतुदीनुसार काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा आभा शुक्ला यांनी दिला.
 
महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना या योजनेसाठी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यांनी या प्रकल्पांना लागणाऱ्या जागा ताब्यात देण्यासाठी समन्वय साधून येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम करावयाचे आहे. सोबतच महसूल, पोलीस, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांनीही या कामातील अडचणी दूर कराव्यात, अशा सूचना शुक्ला यांनी दिल्या.
Powered By Sangraha 9.0