पुणे, 31 जुलै (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
महापालिकेच्या हद्दीमध्ये वर्षभरामध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढला आहे. ई-व्हेईकल्स आणि सीएनजीसारख्या प्रदूषण विरहित इंधनावर चालणाऱ्या वाहनांची संख्याही समाधानकारकरित्या वाढत आहे. परंतु, त्याचवेळी लोकसंख्या आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांचे प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिक वाढत असल्याने दशकभरात कार्बन उत्सर्जन दुपटीने वाढल्याची माहिती महापालिकेच्या 2024-25 या वर्षीच्या पर्यावरण अहवालातून समोर येत आहे. पुणे महापालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या 2024- 25 या वर्षीच्या पर्यावरण अहवालाला मंगळवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.
याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी., प्रदीप चंद्रन, ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पर्यावरण विभागाचे प्रमुख संतोष वारूळे, या विभागाचे माजी प्रमुख व निवृत्त अधिकारी मंगेश दिघे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी विशेषत: जल, वायुप्रदूषण कमी करण्यासाठी सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु, शहराचा भौगोलिक विस्तावर आणि लोकसंख्या वाढत असताना वाहनांच्या संख्येत मोठी भर पडत आहेत.
पुणे शहरात आतापर्यंत 42 लाख वाहनांची नोंद झाली असून, मागील वर्षभरात नव्याने तीन लाख 11 हजार नवीन वाहनांची भर पडली आहे. यामध्ये 33 हजार 387 इलेक्ट्रिक, तर 43 हजार 533 सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. साधारण 20 टक्के नवीन पर्यावरणपूरक इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. पीएमपीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक व सीएनजीवर धावणाऱ्या तब्बल 88 टक्के बसेस आहेत. सौर ऊर्जा प्रकल्पांना देखील ‘अच्छे दिन’ आले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट सौर ऊर्जा निर्मिती होत आहे. 2023-24 मध्ये शहरात 79 हजार 618 किलो वॅट सौर ऊर्जा निर्मिती झाली होती. यंदा यामध्ये दुपटीहून अधिक नोंद झाली असून, आजमितीला एक लाख 66 हजार 513 किलो वॅट विजेची निर्मिती ही सौर ऊर्जेद्वारे करण्यात आली आहे.
निवासी भागातच सौर ऊर्जेचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरातील स्मशानभूमींमध्ये अत्याधुनिक यंत्रणेचा वापर वाढविण्यात आला आहे. तब्बल 56 टक्के अंत्यसंस्कार हे विद्युत आणि गॅस दाहिनीत होत आहेत. तर, लाकडावरील पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्काराचे प्रमाण हे 44 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. उद्यानांची संख्या एका वर्षात 13 ने वाढून 224 पर्यंत पोहोचली आहे. शहरातील नद्या आणि तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. प्रामुख्याने एसटीपी प्लांटसची उभारणी करण्यात येत असून शहरातील पाषाण, जांभूळवाडी आणि कात्रज तलावात जाणारे मैलापाणी रोखण्यासाठी कामे करण्यात आली आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. लोकसंख्या आणि इंधनाच्या वाढत्या वापरामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. महापालिका व नागरिकांकडून पारंपरिक ऊर्जेचा वापर वाढत असताना वाढती लोकसंख्या आणि कचऱ्यामुळे प्रदूषणात भर पडत असल्याचे अहवालातून समोर येत आहे.
शहरातील वार्षिक कार्बन उत्सर्जन एक कोटी 2 लाख टनांच्या पुढे अर्थात प्रतिव्यक्ती 2.47 टनांपर्यंत पोहोचले आहे. ही आकडेवारी 2021-22 ची असून, आता त्यामध्ये भर पडत आहे. 2011- 12 च्या नोंदीनुसार हे प्रमाण प्रतिव्यक्ती 1.46 टनांपर्यंत होते. निकटच्या दोन वर्षांची तुलना केली असता शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत चालल्याचे अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 2024-25 मध्ये वर्षातील केवळ 52 दिवस चांगली हवा होती, तर 137 दिवस समाधानकारक, तर 174 दिवस मध्यम स्वरूपाची होती. मागील वर्षी तीन दिवस हवा एकदमच प्रदूषित होती. मात्र 2023-24 मध्ये 79 दिवस चांगली हवा, 145 दिवस समाधानकारक, 140 दिवस मध्यम तर एक दिवस खराब होती.
प्रदूषण कमी करून, कार्बन उत्सर्जनात घट करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. हरित उपाययोजनांच्या बाबतीत पुढील दोन वर्षात पुण्यामध्ये मोठ्या सुधारणा दिसून येतील.
-नवल किशोर राम, (महापालिका आयुक्त)