पुणे, 8 जुलै (आ.प्र.) :
महापारेषणच्या 220 केव्ही इन्फोसिस ते 220 केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीजवाहिनीत हिंजवडी फेज-2 मेट्रो स्थानकाजवळ रविवारी दुपारी बिघाड झाल्यामुळे महावितरणच्या गणेशखिंड व पुणे ग्रामीण मंडळातील सुमारे 52 हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला होता. महावितरणने युद्धपातळीवर नियोजन करून सोमवारी पहाटेपर्यंत सर्व लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने व टप्पाटप्प्याने सुरळीत केल्याने नागरी भागांना दिलासा मिळाला. काही उच्चदाब ग्राहकांना वीजपुरवठा सुरू होण्यास अवधी लागणार आहे.
महापारेषणने नियोजित देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 असा वीजपुरवठा बंद केला होता. देखभाल-दुरुस्तीचे काम आटोपून वीजपुरवठा सुरू करताना दुपारी सव्वादोनच्या सुमारास 220 केव्ही इन्फोसिस ते 220 केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीजवाहिनीत मोठा बिघाड झाला. परिणामी, महावितरणच्या ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या 22 केव्हीच्या 25 वाहिन्या, अतिउच्चदाबाचे इन्फोसिस व नेक्सट्रा हे दोन ग्राहक अशा 91 उच्चदाब आणि 52 हजारांहून अधिक लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. यात पिंपरी विभागातील 20 हजार व मुळशी विभागातील 32 हजार घरगुती व वाणिज्यिक लघुदाब ग्राहकांचा समावेश होता.
रविवारी संध्याकाळी 6 पर्यंत महापारेषणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरूच होते. तत्पूर्वीच महावितरणने संभाव्य वीजसंकट ध्यानात घेऊन पर्यायी मार्गाने वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने युद्धपातळीवर नियोजन केले. जनमित्रांपासून मुख्य अभियंत्यांपर्यंत व देखभाल-दुरुस्तीचे काम करणाऱ्या एजन्सी व त्यांच्या कामगारांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे महावितरणला वीजपुरवठा कमी कालावधीत सुरू करणे शक्य झाले. महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड व पुणे ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता युवराज जरग यांच्यासह सर्व वरिष्ठ अभियंत्यांनी अचूक नियोजन करून वीजपुरवठा पर्यायी मार्गाने वळवण्यात यश मिळवत मोठ्या वीजसंकटावर मात केली.